'पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांचे कार्य भारतरत्‍न पुरस्‍कार पेक्षाही मोठे'



माय नगर वेब टीम 

 लोणी :    पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांचे कार्य भारतरत्‍न पुरस्‍कार पेक्षाही मोठे आहे. त्‍यांना भारतरत्‍न पुरस्‍कार का मिळाला नाही असा प्रश्‍न उपस्थित करुन, क्रिकेट आणि गाण्‍याच्‍या क्षेत्रातील व्‍यक्तिंना हा पुरस्‍कार मिळतो तर पद्मश्रीं सारख्‍या व्‍यक्तिने संपूर्ण आयुष्‍य समाज व सहकाराकरीता झिजवीले असल्‍याने त्‍यांनाही केंद्र सरकारने भारतरत्‍न  पुरस्‍कार देण्‍याची मागणी अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्ष डॉ.रविंद्र शोभणे यांनी साहित्‍य पुरस्‍कार वितरण समरंभात केली.


       सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या   १२४ व्‍या जयंती दिनाचे औचित्‍य साधून राज्‍यस्‍तरीय साहित्‍य आणि कलागौरव पुरस्‍काराचे वितरण रविंद्र शोभणे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आणि केंद्रीय आयुष राज्‍यमंत्री प्रतापराव जाधव यांच्‍या उपस्थित करण्‍यात आले.


       पुरस्‍काराचे हे ३४ वे वर्ष असून, यंदाच्‍या वर्षी मुंबई येथील जेष्‍ठ साहित्‍यीक आणि विचारवंत प्रेमानंद गज्वी यांना जीवनगौरव पुरस्‍काराने गौरविण्‍यात आले. कानपुर येथील समिर चव्हाण यांच्‍या ‘अखई ते जाले या ग्रंथास उत्‍कृष्‍ठ साहित्‍य पुरस्‍कार, नागपुर येथील प्रफुल्ल शिलेदार यांच्‍या ‘हरवलेल्या वस्तुंचे मिथक’ या कविता संग्राहास विशेष साहित्‍य  पुरस्‍कार, संगमनेर येथील श्रीनिवास हेमाडे यांच्या ‘तत्वभान’ या वैचारिक ग्रंथास अहमदनगर जिल्‍हा उत्‍कृष्‍ठ साहित्‍य पुरस्‍कार, नेवासा येथील बाळासाहेब लबडे यांच्‍या ‘काळ मेकर लाईव्ह’ या कांदबरीस जिल्‍हा विशेष साहित्‍य पुरस्‍कार, कर्जत येथील हसन शेख पाटेवाडीकर यांना कलेच्‍या सेबेबद्दल पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कलागौरव पुरस्‍कार, नाशिक येथील प्राजक्त देशमुख यांना नाट्यसेवा पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले.


       याप्रसंगी महसूल मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील, माजीमंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील, डॉ.सुजय विखे पाटील, सौ.शालिनीताई विखे पाटील,पुरस्‍कार निवड समितीचे अध्यक्ष रावसाहेब कसबे यांच्‍यासह प्रवरा उद्योग समुहातील विविध संस्‍थाचे पदाधिकारी उपस्थित होते.


       आपल्‍या भाषणात शोभणे म्‍हणाले की, बुध्‍दीप्रमाण्‍य वादाचा स्विकार करतो तो सत्‍याच्‍या धर्माची जान ठेवतो. यासाठी प्राणाची अहुती देणारा जागतीक स्‍तरावरील इतिहास आपल्‍या स्‍वातंत्र्यापर्यंत दिसून येतो. या सत्‍याचा अभिमान आम्‍हाला आहे, या अभिमानाचे आम्‍ही पाईक आहोत असे स्‍पष्‍ट करुन ज्ञान सत्‍तेने आखुन दिलेल्‍या व बुध्‍दी  प्रामाण्‍यवादाच्‍या पणतीला समोर ठेवून जगण्‍याचा मार्ग सुकर करण्‍याचा प्रयत्‍न साहित्‍यीक करीत असतात.


ग्रंथ प्रामाण्‍यवादा मध्‍ये प्रश्‍न विचारण्‍याची संधी नसते कारण ती पुर्वापार चालत आलेली पंरपरा आहे. मात्र बुध्‍दी प्रामाण्‍यवादाचा स्विकार करणाराच प्रश्‍न विचारु शकतो. कारण ज्ञानसत्‍तेचा प्रतिनिधी स्‍वत:चे सत्‍व जोपासून आखून दिलेला जगण्‍याचा मार्ग सुकर करीत असतो.कारण ज्ञानसत्‍तेचा प्रतिनिधी राजसत्‍ता आणि धर्मसत्‍ते पुढे झुकत नाही असे स्‍पष्‍ट मत त्‍यांनी व्‍यक्त केले.


       महाराष्‍ट्र हा ग्रामीण प्रांत आहे. ग्रामीण भागातील तानेबाणे मांडणारा महाराष्‍ट्र हा एकमेव प्रांत आहे. लेखक श्री.म माटे यांच्‍या पासून ते हरिभाऊ आपटेंपर्यंत सर्वांनी हीच परंपरा जोपासली. याचा संदर्भ देवून शोभणे म्‍हणाले की, दुष्‍काळातील शेतक-याला बोलके करण्‍याचा प्रयत्‍न  केल्‍याचे संचित हे आपल्‍या पाठीमागे उभे आहे. हे संचित अधिक जगण्‍याचे आणि उन्‍नत करण्‍याचे काम अशा पुरस्‍कारामुळे होत असते.


       पद्मश्री डॉ.विखे पाटील पुरस्‍कार हा अशा पुरस्‍कारांपैकीच एक आहे असे गौरवोद्गार काढुन या पुरस्‍कारामुळे कुठेही वाद निर्माण झाले नाही. या पुरस्‍काराचे निकष अतिशय प्रांजळ आहे. ज्‍या पुरस्‍काराचे निकष प्रांजळ नव्‍हते ते पुरस्‍कार केव्‍हाच बंद पडले. विखे पाटील परिवाराने चौथ्‍या पिढीपर्यंत ही पुरस्‍काराची योजना सुरु ठेवली. दिवसागणीक या पुरस्‍काराच्‍या योजनेमध्‍ये वाढच होत आहे.केवळ साहित्‍यच नाही तर नाट्य कला क्षेत्रासाठी सुध्‍दा ही योजना सुरु केली. ही योजना ना.विखे पाटील बंद पडू देणार नाहीत असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.


       केंद्रीय आयुष राज्‍यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पद्मश्री डॉ.विखे पाटील व पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्‍या वाटचालीचा गौरव करुन, त्‍यांचा आदर्श तरुण पिढीने डोळ्यासमोर ठेवला पाहीजे. त्‍यांनी उभ्‍या केलेल्‍या सहकारामुळे प्रगत राज्‍य म्‍हणून महाराष्‍ट्र देशात पुढे आले आहे. त्‍यानंतर देशातही सहकारी चळवळीचा अवलंब करण्‍यात आला. सहकारातून समाजाचा उध्‍दार करण्‍याचे काम झाले. त्‍यामुळे पद्मश्री विखे पाटील हे समाज व सहकाराचा सन्‍मान होता. त्‍यांचा आदर्श सर्वांना प्रेरणादायी असल्‍याचे ना.जाधव म्‍हणाले.


       याप्रसंगी साहित्‍य जीवन गौरव पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आलेले जेष्‍ठ नाट्य लेखक प्रेमानंद गज्‍वी यांनीही आपले मनोगत व्यक्‍त  केले. पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी पुरस्‍कारा मागची भूमिका स्‍पष्‍ट करुन, जिल्‍ह्याला लाभलेली साहित्‍य परंपरा विचारात घेवून मराठी भाषेला समृध्‍द करण्‍यासाठी अहिल्‍यानगर येथे मराठी भवन बांधण्‍याचा निर्णय जाहिर केला. पुरस्‍कार निवड समितीचे अध्‍यक्ष डॉ.रावसाहेब कसबे यांनी पुरस्‍कारांची घोषणा केली. याप्रसंगी डॉ.राजेंद्र सलालकर यांनी लिहीलेल्‍या तिव्र कोमल समिक्षेचे प्रकरण या पुस्तकाचे प्रकाशन मान्‍यवरांच्‍या उपस्थितीत करण्‍यात आले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post