सैनिक भावांना राणीताईंनी पाठविल्या राख्या! नगर दक्षिणेतील ८ हजार सैनिकांना पोष्टाद्वारे राख्या रवाना



राख्यांसोबत खा. नीलेश लंके, राणीताई लंके यांचे पत्रही 

माय नगर वेब टीम 

अहमदनगर :   देशाच्या संरक्षण सेवेत कार्यरत असलेल्या नगर दक्षिण मतदारसंघातील ८ हजार सैनिकांना जिल्हा परिषदेच्या मा. सदस्या राणीताई लंके यांनी राख्या पाठविल्या असून देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या या भावांप्रती राणीताईंसह खा. नीलेश लंके यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. 

     गेल्या काही वर्षांपासून खा. नीलेश लंके हे समाजकारण, राजकारणात सक्रीय असून नगर जिल्हयासह राज्यात त्यांचा संपर्क आहे. त्यांच्या अर्धांगिनी जि.प. च्या मा. सदस्या राणीताई लंके यांचाही संपर्क दांडगा असून राणीताई म्हणून त्या परिचित आहेत. खा. लंके यांच्या सहकाऱ्यांसह जिल्हयातील, जिल्हयाबाहेरील लंके यांच्या चाहत्यांसाठी राणीताईंचे नाते बहिणीप्रमाणे आहे. याच नात्याची जाण ठेऊन राणीताई यांनी देशाच्या सीमेवर असलेल्या भावांसाठी पोष्टाद्वारे राख्या पाठवून बहिण भावाच्या पवित्र नात्याला उजाळा दिला आहे.


▪️खा. नीलेश लंके व राणीताई लंके यांनी सैनिक भावांना पाठविलेले पत्र जसेच्या तसे

प्रिय भावास

सस्नेह नमस्कार !

आम्हाला आपल्याशी या पत्राच्या माध्यमातून संवाद साधताना आनंद होत आहे. रक्षाबंधनाला सीमेवरील जवानांना बहिणीची उणीव निश्चित भासते. या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम, पराक्रम, सय्यम आणि साहस होय. रक्षाबंधनाच्या पवित्र सणाच्या निमित्ताने एक बहिण म्हणून मला तुमची आठवण येत आहे.

        एक सक्षम भाऊ म्हणून आपण सीमेवर संरक्षणाची जबाबदारी पार पाडत आहात. आपण सीमेवर देशाचे संरक्षण करत आहात म्हणून आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत. देशासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या सर्व सैनिकांचे आभार. आपण सलग बाराही महिने संरक्षणासाठी सीमेवर डोळ्यात तेल घालून काम करत असतात. त्यामुळे महत्वाच्या सणालाही आपल्या बहिणीच्या हातीने राखी बांधायला येणे शक्य होत नाही त्यामुळे आपल्या लाडक्या बहिणीकडून आपणास राखी पाठवत आहे.

        आपण सर्वांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये माझ्यावर जो विश्वास दाखविला, जे प्रेम दाखविले त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आपण आमच्यावर जो विश्वास दाखविला आहे त्यास आम्ही तडा जाऊ देणार नाही. आपल्या कुटूंबातील एक सदस्य म्हणून आपण हक्काने आमच्याशी संपर्क साधावा. देश सीमेवर कर्तव्य करत असताना आपल्या काही अडचणी असल्यास, किंवा काही कौटूंबिक अडचणी असल्यास त्या सोडविण्याचा आम्ही दोघेही निश्चितच प्रयत्न करू. आपल्या मदतीसाठी आम्ही दोघेही नेहमी तत्पर राहू.

       सुट्टीदरम्यान आपण गावी आल्यावर तुमच्याशी गप्पा मारण्यास व अनुभव समजुन घेण्यास आम्हाला निश्चितच आनंद वाटेल. या रक्षाबंधन सणानिमित्त जो स्नेह निर्माण झाला आहे तो स्नेह तसाच राहून अधिकाधिक वृद्धींगत होत राहावा हीच अपेक्षा.

        तुम्हाला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा! प्रेमाचा हा सण तुमच्या आयुष्यात खूप आनंद आणि शुभेच्छा घेऊन येवो!

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post