तरुणांना खुशखबर! अहमदनगर जिल्हा बँकेत 700 पदांसाठी नोकर भरती, असा करा अर्ज...



माय नगर वेब टीम 

अहमदनगर-जिल्हा सहकारी बँकेत संचालक मंडळाच्या मान्यतेने सुमारे 700 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून बँकेच्या भरती प्रक्रियेबाबत सुरू असणारे चर्चेचे गुर्‍हाळ यामुळे संपणार आहे. उद्या शुक्रवारपासून (दि.13) इच्छुक उमेदवारांना 27 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे जिल्हा बँकेच्या या भरतीतून निवड होणार्‍या उमेदवारांना अनेक परीक्षांसह दिव्य पार केल्यानंतर वर्षभर परिविक्षाधिन कालावधीच्या नावाखाली 12 ते 15 हजार रुपयांत राबवून घेण्यात येणार आहे.


जिल्हा बँकेच्या भरतीबाबत गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा ते राज्य आणि सरकार पातळीवर चर्चा सुरू आहे. अलिकडच्या काही वर्षात बँकेच्या भरतीसह अनेक बाबींवर शासन, सहकार खात्याच्या यंत्रणेसह राजकीय पातळीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. बँकेकडून संचालकांच्या मान्यतेने वारेमाप करण्यात येणारा खर्च यासह बँकेच्या कर्जाचा बिघडलेला कर्जाचा रेशो (मर्यादा) आदी बाबी चर्चेत असताना आता बँकेच्या भरतीचा विषय समोर आला आहे. बँकेच्या लिपिक पदाच्या 687, वाहन चालकांच्या 4 आणि सुरक्षा रक्षकाच्या 5 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासाठी उद्यापासून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येणार आहे.


बँकेची भरती प्रक्रिया राबवण्यासाठी पुण्याच्या वर्कवेल इन्फोटेक कंपनीची निवड संचालक मंडळाने केलेली आहे. भरतीसाठी निवड करण्यात आलेल्या कंपनीसह तिच्या निवडीची प्रक्रिया गुलदस्त्यात असतांना आता थेट भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. बँकेच्या लिपिक पदासाठी बी. कॉम, एमबीए (बँकिंग, फायनान्स) एलएबी, एलएसएम, डीएलटीसी यासह वाणिज्य विभागातील शिक्षणाची अटक आहे. यासह बँकिंग क्षेत्रातील तीन वर्षाचा अनुभव या भरतीसाठी उमेदवारांना राहणार आहे. दरम्यान, या भरतीसाठी बँकेच्यावतीने काही अटी शर्ती ठेवून कोणत्याही परिस्थितीत बँकेेशिवाय परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांची निवड अंतिम होणार नसल्याचा अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे. यामुळे भरतीबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता नाकारात येत नाही.


बँकेच्या भरतीबाबत लेखी परीक्षेत पास झाल्यानंतर दहा गुणांची तोंडी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेत तोंडी पास झाल्यानंतर जिल्हा बँकेत काम करण्याची संधी मिळणार आहे. यातही सुरूवातीच्या वर्षभर लिपिकांना 15 हजारांवर तर वाहन चालक व सुरक्षा रक्षक यांना अवघ्या 12 हजारांत काम करावे लागणार आहे. त्यांचा परिविक्षाधिन कालावधी पूर्ण झाल्यावर ते बँकेच्या सेवत येणार आहेत. दरम्यान त्यांना 3 वर्षे बँकेची नोकरी सोडता येणार नसल्याची हमी द्यावी लागणार आहे.


भरतीच्या पदामध्ये बदल होण्याची शक्यता असून यावर उमेदवारांच्या तक्रारी ग्राह्य धरता येणार नाहीत. भरतीबाबतचे अधिकार हे बँकेने (संचालक मंडळाने) राखून ठेवलेले आहेत. भरतीच्या पदाबाबत बदल झाल्यास त्याबाबतची माहिती बँकेच्या संकेतस्थळावर कळण्यात येणार आहे. भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा होणार असून निवड यादीत नाव आले तरी नियुक्तीबाबत संबंधित पात्र उमेदवारांना नियुक्तीचा हक्क सांगता येणार नाही. उमेदवारांच्या कागदपत्रांच्या अधीन राहून उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post