अहमदनगर ब्रेकिंग : धनगर आरक्षण मागणीसाठी आंदोलकांची गोदावरीत उडी



प्रवरासंगमवरील घटना, शोध सुरू, संतप्त आंदोलकांनी महामार्ग रोखला
माय नगर वेब टीम
अहमदनगर  धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण, तसेच आरक्षणाचे प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या दोघांनी नेवासा तालुक्यातील प्रवरा संगम येथे गुरुवारी गोदावरी नदीपात्रात उडी घेऊन जलसमाधी घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सायंकाळी उशिरापर्यंत या दोघांचा शोध घेतला जात होता. शोधकार्यासाठी ‘एनडीआरएफ’च्या पथकाला पाचारण केल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली. प्रल्हाद चोरमारे (रा. छत्रपती संभाजीनगर) व बाळासाहेब कोळसे (रा. पाथर्डी, नगर) अशी उडी मारणाऱ्या आंदोलकांची नावे आहेत. दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील वातावरण तणावाचे बनले असून, आंदोलकांनी पुणे – छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखून धरत घोषणाबाजी केली. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवला आहे.


नगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथे आरक्षण मागणीसाठी धनगर समाजातील प्रल्हाद चोरमारे, बाळासाहेब कोळसे यांच्यासह राजू तागड, रामराव कोल्हे, भगवान भोजने व देवीलाल मंडलिक या सहा जणांनी १८ पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या प्रश्नी निर्णय होत नसल्याच्या निषेधार्थ अखेर आज आंदोलक पुणे – छत्रपती संभाजीनगर महामार्गावर गोदावरी पुलावर जमा झाले. या वेळी वरील आंदोलकांनी गोदावरी नदीमध्ये उडी मारली. संबंधितांच्या मोटारीमध्ये धनगर समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा निषेध म्हणून आम्ही जलसमाधी घेत असल्याचा मजकूर असलेली चिठ्ठी मिळाली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post