लाडकी बहीण योजनेच्या लाभांमुळे संसाराला बळ मिळालं ; महिला सशक्तीकरण मेळाव्यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद



माय नगर वेब टीम 

शिर्डी  :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशांच्या लाभामुळे संसार करण्यास बळ मिळाले आणि संसारास हातभार लागला, अशा भावना शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यासाठी उपस्थित महिला भगिनींनी व्यक्त केल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झालेली भेटही त्यांना सुखावून गेली.


महिला मेळाव्याच्या निमित्ताने शिर्डी येथील श्री साईबाबा प्रसादलयामागील शेती महामंडळ मैदान परिसर महिला भगिनींनी फुलला होता. सर्वत्र महिलांचे आनंदी आणि उत्साही चेहरे दिसत होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळालेली  रक्षाबंधनाची ओवाळणी कायम स्मरणात राहणार असल्याच्या भावना यावेळी व्यक्त केल्या. सांस्कृतिक कार्यक्रमाच्यावेळी त्यांनी केलेल्या जल्लोषाने त्यांना झालेला आनंद दिसून आला.


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पैशांचा उपयोग घरकामांच्या खर्चासाठी करून घेतला, अशी भावना श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव येथील भाग्यश्री कुलांगे यांनी दिली‌. लाडकी बहीण योजनेच्या मिळालेल्या पैशांतून मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करता येईल अशी प्रतिक्रिया राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील मंगला तेलोरे यांनी दिली.


लाडकी बहीण योजनेच्या पैशांतून घरगुती पशुउद्योग सुरू करणार असल्याची प्रतिक्रिया राहुरी तालुक्यातील खंडाबे येथील लाभार्थी महिला सुनिता बबन महानोर यांनी दिली‌.


ढोल ताशांचा गजर, लेझीम पथके, महिलांच्या मनोरंजनासाठी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम आणि संगीताचे सूर असे घरगुती समारंभाचे स्वरुप  अनुभवतांना महिलांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. शासनाने सांगितल्याप्रमाणे रक्षाबंधनपूर्वी योजनेत रक्कम जमा झाल्याने शासनाविषयी विश्वासाची भावनाही कार्यक्रमात दिसून आली. आताप्रमाणे दर महिन्यात रक्कम जमा होईल याची खात्री आहे, अशा प्रतिक्रिया महिलांनी दिल्या.


राज्यातील महिलांचे आर्थिक स्वावलंबन, आत्मनिर्भर करणे, महिलांचे आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे थेट महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याने  कुटुंबातील आमची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनाने महिलांना दिलेला आधार खूप मोलाचा आहे. लाडक्या बहिणींना हक्काचा आधार दिला असल्याच्या प्रतिक्रियाही महिलांनी दिल्या.


दर महिन्याला हक्काचे पैसे मिळणार असल्याने आमच्या संसाराला आधार झाल्याचे संगमनेर तालुक्यातील मेंढवण  येथून आलेल्या सुंदराबाई वसंत भोसले यांनी सांगितले.


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अशा अनेक चांगल्या प्रतिक्रिया कार्यक्रमाला आलेल्या महिलांनी व्यक्त केल्या. शासनाची ही भेट त्यांच्यासाठी अमूल्य असल्याचे दिसून आले आणि त्यामुळेच शासनाला त्यांनी धन्यवादही दिले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post