हजारो महिलांना होणार देवी दर्शनाचा लाभ
माय नगर वेब टीम
पारनेर : नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही ४ ते १० ऑक्टोबर दरम्यान मोहटादेवी यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून सात दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवात पारनेर-नगर मतदारसंघातील हजारो माता भगिनींना मोहटादेवी दर्शनाचा लाभ होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मा. सदस्या राणीताई लंके यांनी दिली.
राणीताई लंके यांनी सांगितले की, दरवर्षीचा शारदीय नवरात्रोत्सव आम्हा माता भगिनींसाठी जिव्हाळयाचा विषय असतो. या पर्वात सत्वाची देवी तसेच नवसाला पावणाऱ्या मोहटादेवीच्या दर्शनाची पर्वणी प्रत्येक महिलेस हवी हवीशी वाटते. वर्षभर घरात राबणाऱ्या माता भगिनींना मोहटादेवीचे मोफत दर्शन व्हावे या भावनेतून खा. नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून मोफत मोहटादेवी यात्रोत्सवाचे गेल्या काही वर्षांपासून आयोजन करण्यात येत आहे. नवरात्रोत्सवात मोहटा देवीच्या दर्शनाचा लाभ होत असल्याने दिवसेेंदिवस या यात्रोत्सवाला माता भगिनींचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. या पार्श्वभुमीवर माता-भगिनींसाठी यंदाही मोहटादेवी दर्शन यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे लंके म्हणाल्या.
दि. ४ ऑक्टोबर रोजी हंगे येथे या यात्रोत्सवाचा शुभारंभ होणार असून दि.५ रोजी पारनेर येथील क्रीडा संकुलावरून निघोज व अळकुटी पंचायत समिती गण तसेच पारनेर शहरातील महिलांच्या यात्रेचे प्रस्थान होणार आहे. दि. ६रोजी पारनेरच्या क्रीडा संकुलावरून कान्हूर व जवळा पंचायत समिती गणातील महिला, दि. ७ रोजी टाकळी ढोकेश्वर व कर्जुले हर्या गणातील महिलांच्या बसचे प्रस्थान टाकळी ढोकेश्वर येथून होणार आहे. दि. ८ रोजी भाळवणी येथून ढवळपुरी व भाळवणी गण, दि. ९ रोजी नगर तालुक्याच्या भाग १ तर दि.१० सप्टेंबर रोजी नगर तालुका भाग २ मधील महिलांच्या यात्रेचे प्रस्थान होणार असल्याचे लंके म्हणाल्या.
खा. लंके यांच्याकडून आढावा
या यात्रेचे नीलेश लंके प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी गावनिहाय नियोजन केले असून मंगळवारी खा. नीलेश लंके यांनी पारनेर येथील संपर्क कार्यालयात यात्रोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. कोणत्या गावात कोणावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे याचीही खातरजमा लंके यांनी केली.
Post a Comment