माय नगर वेब टीम
अहमदनगर : औरंगाबाद-नगर ते पुणे या महामार्गाचा ताबा राष्ट्रीय महामार्गाकडे देऊन या महामार्गाचे काम नहीकडून एका टप्प्यात पुर्ण करण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
या पत्रामध्ये नमुद करण्यात आले आहे की, औरंगाबाद-नगर ते पुणे हा महामार्ग सहा पदरी करण्यात येऊन तो काँक्रीटीकरणाने बांधण्यात यावा. त्यासाठी या महामार्गाचा ताबा राष्ट्रीय महामार्गाकडे देण्यासंदर्भात आपणासह शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे, औरंगाबादचे खासदार संदिपान भुमरे यांनी केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांची जुलै महिन्यात भेट घेऊन मागणी केली होती. याच मागणीसंदर्भात गडकरी यांच्याशी पत्रव्यवहारही करण्यात आलेला आहे. २२५ किलोमिटर लांबीचा हा रस्ता केंद्र सरकाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५ एफ यापूर्वीच घोषीत करण्यात आलेला आहे. फक्त या रस्त्याचा ताबा राष्ट्रीय महामार्गाकडे गेलेला नसल्याकडे लंके यांनी या पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.
दरम्यान हा महामार्ग राज्य सरकारच्या वतीने एमएसआयडीसी मार्फत तीन टप्प्यात करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. दुर्देवाने एमएसआयडीसी कडे कुठल्याही प्रकारचे मनुष्यबळ उपलब्ध नाही. तसेच मुंबई वगळता इतरत्र कोणत्याही अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही नाहीत. त्यामुळे हा रस्ता राज्य सरकारकडून पुर्ण होईल की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहेत. या महामार्गाचे तीन टप्पे करून तीन टोलनाके टाकून टोल वसुली करणे अन्यायकारक आहे. यामुळे सामान्य लोकांसह औद्योगिक क्षेत्रातील वाहतूकीला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. शिवाय रस्त्याच्या कामाचा दर्जा कसा राहिल हे सांगता येत नाही. सद्यस्थितीत हा रस्ता प्रचंड खराब झालेला असून त्याचे तात्काळ केाम होणे अत्यंत गरजेचे आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणूका पाहता या रस्त्याची घोषणा घाईत झालेली दिसते तसेच विधानसभा निवडणूकीमुळे या रस्त्याच्या कामास विलंब होऊ शकतो अशी शंकाही लंके यांनी या पत्रात व्यक्त केली आहे.
एका टप्प्यात रस्त्याचे काम पुर्ण होईल
ज्या खाजगी उद्योजकाने या रस्त्याची बांधणी केली आहे त्यांची उर्वरीत रक्कम एकत्रीत आदा करून औरंगाबाद-अहमदनगर ते पुणे महामार्गाचा ताबा राष्ट्रीय महामार्गाकडेच देण्यात यावा व महामार्गाचे काम नहीकडूनच करण्यात यावे जेणेकरून या महामार्गाचे काम एका टप्प्यात पुर्ण होउन सहापदरी काँक्रीटचा रस्ता होईल असा विश्वास लंके यांनी या पत्रात व्यक्त केला आहे.
Post a Comment