माय नगर वेब टीम
अहमदनगर - खासदार निलेश लंके यांच्या आंदोलनानंतरही नगर तालुक्यात अवैध धंद्यांना लगाम लागलेला नाही. नागरिक अक्षरशः वैतागली आहेत. नगर-दौंड रोडवरील कर्डिलेंचा तर नगर-सोलापूर रोडवर रुईछत्तीशीचा कुटुणखाना खुलेआम पोलिस प्रशासनाच्या आशिर्वादाने खुलेआम सुरु असल्याचे भयान वास्तव आहे. खासदारांनी लंके यांनी आंदोलन करुनही अवैध सुरुच कसे असा रोकडा सवाल तालुक्यातील नागरिक करत आहेत.
नगर तालुक्यातील बहुतांश गावे नगर तालुका पोलिस स्टेशन हद्दीत आहेत. तर काही गावे भिंगार व काही गावे एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत आहेत. खासदार निलेश लंके यांनी पोलिस प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण केले होते. आयजी यांनी लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले. दरम्यान खासदार लंके यांनी आंदोलनादरम्यान पोलिसांची हप्तेखोरीचे रेटकार्डच जाहीर करुन टाकले होते. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. आंदोलनानंतर लगेच जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांना अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार काही दिवस पोलिस ठाण्यांच्या कारभाऱ्यांनीही अवैध धंद्यांवर कारवाईचा दिखावा केला. परंतू, नगर तालुक्यात मात्र पोलिस अधीक्षकांच्या आदेशाला तालुका पोलिसांनी केराची टोपली दाखविली असल्याचे बोलले जात आहे. तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरुच आहे. तसेच खासदार लंके यांच्या आंदोलनानंतर अवैध धंद्यांचे रेटही वाढले असल्याचे सांगितले जात आहे.
नगर दौड महामार्गावरील खंडाळा परिसरातील कर्डिलेंचा तर सोलापूर रोड वरील रुईछत्तीशीचा कुंटणखाना खुलेआम सुरु असल्याने त्या धंद्यांना पोलिसांचा आशिर्वाद तर नाही ना असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. नगर दौंड रोड, नगर सोलापूर रोड, नगर पुणे रस्त्यावर होत असलेल्या लॉजिंगमुळे ही महामार्ग पुर्णतः बदनाम झाले आहेत. त्यामुळे नगर तालुका पोलिसांचा धाक संपलाय का असाच प्रश्न उपस्थित होत आहे. आता जिल्हा पोलिस अधीक्षक काय भूमिका घेतात. तालुक्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे धाडस करणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Post a Comment