कृती समितीचा खडकी येथे रास्तारोकोत इशारा | सिंचनभवनवर मोर्चा काढण्याचा निर्णय
माय नगर वेब टीम
अहमदनगर - कुकडी / घोड प्रकल्पात उपलब्ध होणाऱ्या पाण्यातून साकळाई उपसा जलसिंचन पाणी योजनेसाठी पाणी मिळावे, योजनेसाठी पाणी उपलब्धतेचा दाखला तातडीने देण्यात यावा यासाठी साकळाई कृती समिती व नगर-श्रीगोंद्यातील पुढाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. साकळाई योजनेच्या आड येणारे झारीतील शुक्राचार्य ओळखण्याचे आवाहन कृती समितीने करत यापुढे पाणी उपलब्ध दाखला मिळण्यासाठी सिंचनभवनवर मोर्चा काढण्याचा निर्णय यावेळी घेतला आहे.
गेल्या 30 वर्षापासून गाजत असलेल्या साकळाई उपसा जलसिंचन पाणी योजनेसाठी पाणी उपलब्ध प्रमाणपत्र तातडीने मिळावे, साकळाईच्या आराखड्यात मंजूरी मिळावी या प्रमुख मागणीसाठी साकळाई कृती समितीच्यावतीने नगर- दौंड महामार्गावर खडकी येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष बाबा महाराज झेंडे, घनश्याम शेलार, संतोष लगड, संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, राजेंद्र म्हस्के, सोमनाथ धाडगे, सुवर्णा पाचपुते, ज्ञानदेव भोसले, नारायण रोडे, दादा दरेकर, भाऊ आप्पा झेंडे, कृष्ण महाराज, नांदे महाराज, हभप पंडित महाराज टकले, ह भ प दत्तात्रय महाराज झेंडे, सुनील लोंढे, सरपंच ज्ञानदेव कवडे, सरपंच संजय धुमाळ, काशिनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सोने बापू, गोवर्धन कार्ले, डॉक्टर योगेंद्र खाकाळ, संतोष जाधव, जिल्हा परिषद सदस्य दिनुकाका पंधरकर, अनिल वाणी, अमोल लंके, तुकाराम काळे, बाजीराव महाराज झेंडे, अनिल महाराज कोठुळे, रोकडे महाराज, बाबासाहेब कर्डिले, आकाश लंके, गणेश झरेकर, अजिनाथ गायकवाड, दत्ता काळे, रघुनाथ चोभे, महेश कोठुळे, अरुण कोठुळे यांच्यासह लाभ क्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृती समितीचे अध्यक्ष बाबा महाराज झेंडे म्हणाले, गेल्या 30 वर्षापासून साकळाई योजनेचा लढा सुरु आहे. या योजनेच्या नावाखाली अनेकांनी आपल्या पोळ्या भाजून घेतल्यात. पण आता शेतकरी हुशार झाले आहेत. साकळाईच्या जिवावर मोठे झालेल्यांना शेतकरी चांगलाच हिसका दाखवतील. आतापर्यंत साकळाईला पुणेकरांचा विरोध असल्याचे सांगितले जात होते. शनिवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बारामतीत भेट घेतली. साकळाईबाबत भूमिका स्पष्ट करण्याची विनंती केली. त्यांनी साकळाईला आमचा विरोध नसल्याचे सांगत सध्याच्या सरकारने योजनेचा प्रश्न सोडवावा. या सरकारने साकळाईचा प्रश्न न सोडविल्यास महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर हा प्रश्न मार्गी लावण्याची माझी जबाबदारी असले असे सांगत कृती समितीला आश्वस्त केले असल्याचे झेंडे यांनी सांगितले.
साकळाईचे पाणी पुणेकर अडवत असतील तर नगरचे पुढारी काय गवत उपटण्याचे काम करतात का असा रोकडा सवाल राजेंद्र झेंडे यांनी उपस्थित केला. पाणी मिळाल्याशिवाय शांत बसायचे नाही असे सरपंच ज्ञानेश्वर कवडे यांनी सांगितले. 35 गावातील शेतकऱ्यांनी वर्ज्रमूठ बांधल्याशिवाय आपल्याला पाणी मिळणार नाही असे नारायण रोड म्हणाले. यावेळी अनिल महाराज कोठुळे, सोमनाथ धाडगे, राजेंद्र म्हस्के, सुवर्णा पाचपुते आदींची भाषणे झाली.
यावेळी कुकडी प्रकल्प विभागाचे अधिकारी कदम यांनी साकळाईच्या मागण्यांचे निवेदन स्विकारले. तर रास्तारोको आंदोलनासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनामुळे वाहनांच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
वळसे पाटील, पाचपुतेंचा साकळाईला
विरोध; आता सिंचन भवनवर मोर्चा
साकळाई योजनेबाबत आमदार बबनराव पाचपुते यांनी ऊसाचे पाणी कुसळाला द्यायचे का असा सवाल उपस्थित केला होता. या पाचपुतेंच्या विधानाचा सर्वच पुढाऱ्यांनी खरपूस समाचार घेत हल्लाबोल केला. साकळाई योजनेसाठी लागणारे पाणी डॉ. सुजय विखे पाटील यांनी कागदावर दाखविले आहे. परंतू, मंत्री दिलीप वळसेपाटील यांचा साकळाईला विरोध करत आहेत. पाणी उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र दिले जात नाही. त्यामुळे आता यापुढे सिंचन भवनवर मोर्चा काढण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला. दरम्यान, घनश्याम शेलार व बाळासाहेब हराळ यांनी आमदार पाचपुतेंवर जोरदार हल्लाबोल केला.
निवडणुका गेल्या खड्ड्यात, अगोदर
साकळाईचे पाणी द्या ः संदेश कार्ले
निवडणुका आल्या की घोसपुरीचा विषय चर्चेला येतो. माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी पाणी उपलब्ध असल्याचे कागदावर दाखविले. त्याचे पुढे काय झाले असा सवाल करत साकळाई योजना मार्गी लावण्यासाठी लाभधारक शेतकऱ्यांना ठोस भूमिका घ्यावी लागणार असल्याचे सांगितले. घोसपुरी यशस्वीपणे चालविली आता साकळाईही चांगल्या पद्धतीने चालवू असे सांगत निवडणुका गेल्या खड्ड्यात अगोदर साकळाईसाठी पाणी द्या अशी आक्रमक भूमिका मांडली. आता रास्तारोको नाही तर सिंचनभवनवर मोर्चा काढू असे उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले यांनी सांगितले.
Post a Comment