विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजितदादादांचे मोठे विधान; कोणाला लाल दिवा देणार पहा...

 


माय नगर वेब टीम 

पुणे  : “आळंदी खेडची जागा (विधानसभा मतदारसंघ) आपल्याकडे आली तर दिलीप मोहिते यांना पुन्हा एकदा निवडून द्या”, असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार यांनी केलं आहे. अजित पवार हे (१२ सप्टेंबर)  रोजी आळंदी येथील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी अजित पवारांनी उपस्थित नागरिकांना आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा आमदार दिलीप मोहिते यांना निवडून देण्याचं आवाहन केलं. तसेच, “तुम्ही दिलीप मोहिते यांना आमदार करा तुमच्या मतदारसंघाला लाल दिव्याची गाडी मिळेल”, असंही अजित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे. “महायुतीच्या जागावाटपात खेड-आळंदीची जागा आपल्याकडे आली तर आपण पुन्हा एकदा दिलीप मोहिते यांना संधी देऊ, तुम्ही त्यांना आमदार करा”, असं पवार म्हणाले.


अजित पवार म्हणाले, “महायुतीत जागावाटपावर अद्याप चर्चा पूर्ण झालेली नाही. महायुतीमधील नेते यावर चर्चा करत आहेत. कोणतीही जागा जाहीर झालेली नाही. मात्र महायुतीमध्ये ही जागा (आळंदी-खेड) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळाली तर आपल्या वतीने दिलीप मोहिते यांना पुन्हा एकदा उभं करू. साधारण येथील सर्वांचाच कल आहे की विद्यमान आमदारांना (दिलीप मोहिते) अजून एकदा संधी द्यायला हवी. मग तुमच्या मनातलं एक अपूर्ण राहिलेलं लाल दिव्याच्या गाडीचं स्वप्न आपण पूर्ण करू. लाल दिव्याच्या गाडीचं स्वप्न सरपंचपदापासून आमदारपदापर्यंत पोहोचलं आहे, आता अनेकांना वाटतंय थोडं पुढे जावं, लाल दिव्यापर्यंत पोहोचावं. हा प्रवास लाल दिव्याच्या गाडीपर्यंत पोहोचला पाहिजे असं तुम्हा सर्वांना वाटतं आणि मला देखील त्याची कल्पना आहे. मागच्या निवडणुकीत या जिल्ह्याने मला खूप साथ दिली. खेड-आळंदी, राजगुरुनगर, चाकणकरांनो मी तुम्हाला आवाहन करतो की यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा मला साथ द्या”.


दरम्यान, यावेळी अजित पवारांनी सर्व नेत्यांना धर्मांबाबत जपून बोलण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, राजकीय पक्षातील एखादी व्यक्ती एखाद्या समाजाबद्दल, एखाद्या घटकाबद्दल किंवा धर्माबद्दल वाईट बोलते, तेव्हा त्याच्यामुळे दोन समाजांमध्ये दुही निर्माण होते. तुम्हाला तुमच्या विचारधारा मांडायच्या असतील तर खुशाल मांडा. तुम्हाला त्याचा अधिकार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं मत मांडायला हरकत नाही. परंतु, तुम्ही वेगळ्या पद्धतीने बोलता आणि समाजांमध्ये दुही निर्माण करता. समाजात तेढ निर्माण करता, जे समाजासाठी चांगलं नाही. हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र ते कदापी खपवून घेणार नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्या गोष्टींचा तीव्र विरोध करत राहील. कठोर शब्दांत आम्ही त्यांचा विरोध करू. तसेच अशा प्रकरणांमध्ये जी काही कायदेशीर कारवाई करण्याची आवश्यकता असेल ती करायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post