माय नगर वेब टीम
अहिल्यानगर: नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील मृत अंगणवाडी सेविका उमा महेश पवार यांना न्याय मिळण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी, या मागण्यांसाठी ग्रामस्थ आणि कुटुंबीयांनी ठिय्या आंदोलन करत अंत्ययात्रा रोखून धरली. पोलिस आणि जिल्हा प्रशासनासोबत चर्चा आणि लेखी आश्वासन मिळाल्यानंतर शनिवारी (दि. २६) सकाळी ११.४५ वाजता चिचोंडी पाटील अमरधाम येथे मृत अंगणवाडी सेविका पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चिचोंडी पाटील येथील भातोडी रस्त्यावरील मारुतीवाडी येथील मिनी अंगणवाडी सेविकेवर गुरुवारी अत्याचार करून खून करण्यात आला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने मृतदेह नदी पात्रात फेकण्यात आला होता. पोलिसांनी अवघ्या १२ तासांत गुन्ह्याची उकल करत आरोपीला अटक केली होती. संतप्त ग्रामस्थांनी दोन दिवस स्वयंस्फूर्तीने गावातील सर्व दुकाने बंद ठेवले. तर शुक्रवारी रात्री कँडल मार्च काढला होता.
शनिवारी मृत अंगणवाडी सेविकेचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी रुग्ण वाहिकेने आणण्यात आले. सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर शोक सभा झाली. यावेळी खासदार नीलेश लंके, आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, डॉ. संजय कळमकर, सरपंच शरद पवार, माजी सभापती प्रवीण कोकाटे, आदींसह तालुक्यातील आणि परिसरातील राजकीय नेते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पार्थिव ग्रामपंचायत जवळ आणण्यात आले. खासदार लंके व गावातील पदाधिकारी अंगणवाडी सेविकेच्या हस्ते मागण्यांचे निवेदन पोलिसांकडे दिले.
अंत्ययात्रा पुढे घेण्याचा प्रयत्न सुरु असतांना नातेवाईक आक्रमक होत प्रशासनाकडून लेखी आश्वासनाची मागणी करत ठिय्या मांडला. अखेर प्रशासनाने आर्थिक मदत मिळवून देण्यासाठीचे आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. चिचोंडी पाटील ग्रामपंचायत वस्त्यावरील अंगणवाड्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील, असे सरपंच शरद पवार यांनी सांगितले.
Post a Comment