माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : नगर तालुक्यातील बहिरवाडी येथील पिढ्यान पिढ्या वादात अडकलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी बहिरवाडी गावच्या सरपंच सौ. अंजना येवले यांच्या मध्यस्थीला यश आले आहे. रस्त्याचे काम सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बहिरवाडी येथील वाकी वस्तीवरील जगदाळे मळ्यात जाणारा रस्ता अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या वादात अडकला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूने बेरड यांच्या शेत जमिनी होत्या. परंतु त्यांच्यातील अंतर्गत वादामुळे रस्त्याचे काम रखडलेले होते. रस्त्या अभावी परिसरातील नागरिक, शालेय विद्यार्थी, दूध व्यवसायिक यांच्या हाल होत होते. शेतकऱ्यांना शेतीमाल बाजारात आणताना देखील अडचण येत होती.
सरपंच सौ. अंजना येवले यांनी पुढाकार घेत वाद असलेल्या शेतकऱ्यांची माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची भेट घेऊन समस्या सांगितली. कर्डिले यांनी यशस्वी मध्यस्थी करत रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला. संबंधित शेतकऱ्यांनी देखील कर्डिले यांच्या शब्दाला मान देत सामंजसपणा दाखवत अनेक वर्षांपासून रखडलेला रस्ता करण्यास परवानगी दिली. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचा सत्कार कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला.
संबंधित रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले तर कर्डिले यांनी ग्रामस्थांना स्वखर्चाने रस्ता बनवून दिला आहे. सदर रस्त्याचे काम मार्गी लागल्याने बेरड वस्ती, जगदाळे वस्तीवरील नागरिकांच्या रस्त्याची समस्या सुटली आहे. तसेच इमामपूर, छत्रपती संभाजी नगर महामार्गावर जाण्यासाठी हा जवळचा रस्ता म्हणून महत्त्वाचा ठरणार आहे.
सरपंच सौ. अंजना येवले यांच्या पुढाकारातून माजी मंत्री कर्डिले यांच्या प्रयत्नातून अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांनी कर्डिले यांचे अभिनंदन केले आहे. वाकी वस्ती, जगदाळे वस्ती, बेरड वस्ती व परिसरातील नागरिकांनी रस्त्याचे काम मार्गी लागल्याने समाधान व्यक्त केले आहे.
_________________
वाकी वस्तीवरील जगदाळे मळ्यात जाणाऱ्या रस्त्याचे काम पिढ्यान-पिढ्या वादात अडकले होते. परंतु ग्रामपंचायतीचा पुढाकार, बेरड शेतकऱ्यांनी दाखवलेला समजुदारपणा अन् माजी मंत्री कर्डिले यांच्या मदतीने रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. रस्त्यामुळे नागरिकांची सोय होणार आहे.
... सौ. अंजना येवले ( सरपंच, बहिरवाडी )
-------------------
वाड्या वस्त्यांवरील रस्ते हे गाव विकासासाठी महत्त्वाचे दुवे ठरत असतात. शेतकरी, दूध व्यवसायीक, विद्यार्थी यांचे रस्त्याअभावी हाल होत असतात. त्यामुळे गावातील अंतर्गत रस्ते पूर्ण करण्यासाठी प्राधान्य दिले गेले पाहिजे. शेतकऱ्यांनी रस्ता होताना समजूतदारपणा दाखवून रस्त्याचे काम पूर्ण होण्यास मदत करावी.
...... शिवाजी कर्डिले ( जिल्हा बँक अध्यक्ष )
Post a Comment