महाराष्ट्रात २०२९मध्ये स्वबळावर भाजपचे सरकार असेल; अमित शहांचं मोठं विधान

 


माय नगर वेब टीम 

मुंबई : ‘भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी निराशेला गाडून कामाला लागायला हवे. महाराष्ट्रात २०२४ला महायुतीचे सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे,’ असा दावा पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी केला. ‘सन २०२९मध्ये केवळ भाजपच्याच जिवावर महाराष्ट्रात सरकार आणू. त्या वेळी एकट्या कमळाचे सरकार असेल,’ असेही ते म्हणाले. ‘भपकेबाजपणाने निवडणूक जिंकता येत नाही,’ असेही त्यांनी देखावा करणारे आमदार आणि नेत्यांना खडसावले.


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादरमधील स्वामिनारायण मंदिरातील योगी सभागृहात शहा यांच्या उपस्थितीत भाजपचा संवाद मेळावा पार पडला. ‘शक्ती कार्यकर्त्यांची-प्रचिती आत्मविश्वासाची’ असे घोषवाक्य घेऊन भाजपने ठिकठिकाणी मेळावे आयोजित केले आहेत. मुंबईतील मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आलेले शहा मुंबई, ठाणे आणि कोकणातील मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत.


‘मतभेद विसरून काम करा,’ असे आवाहन करून शहा म्हणाले, ‘लोकसभेत दोन जागा आल्या तेव्हा कुणीही पक्ष सोडून गेले नव्हते. आताही राज्यात महायुतीच सरकार स्थापन करील. महाराष्ट्राची निवडणूक देशाची दशा आणि दिशा बदलणारी आहे. ६० वर्षांत महाराष्ट्रात सलग तीनदा एकही पक्ष निवडणूक जिंकलेला नाही. आपण महान भारताच्या रचनेसाठी राजकारणात आलो आहोत.’ ‘राहुल गांधी आणि विरोधी पक्षाचे राजकारण म्हणजे मूर्खपणा आहे,’ अशी टीका शहा यांनी  केली.


मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला देऊन पक्षांतर्गत वादांबाबत शहा म्हणाले, ‘प्रत्येक घरात वाद असतातच, मात्र हे वाद आणि मतभेद निवडणुकीपूर्वी दूर करा. काहींना कामे करायची नसतात; पण खरा कार्यकर्ता काम करताना विचार करीत नाही. जे काम करतात तेच निवडणूक जिंकतात. निराशा झटकून टाका, कुणीही सर्वेक्षणांचा विचार करू नका. राज्यात भाजपचे सरकार येईल त्यासाठी जोमात आणि शुद्धीत राहून काम करा.’


या संवाद मेळाव्यास अमित शहांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, केंद्रीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीश, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, निवडणूक संचालन समिती प्रमुख रावसाहेब दानवे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, मुंबईतील कोअर कमिटीचे सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.


कार्यकर्त्यांना कानमंत्र

राज्यात महायुतीला रोखण्याची ताकद कुठल्याही पक्षात नाही. आपल्याविरुद्ध आपल्या नगरसेवक, आमदार आणि खासदारांच्या विरोधात जनतेत असलेली नाराजी दूर करा. प्रत्येक निवडणूक बूथवर आपल्याला १० कार्यकर्ते पाहिजेत. दसऱ्यापासून प्रचार संपेपर्यंत हे कार्यकर्ते त्यांच्या बूथच्या कक्षेत फिरत राहतील. या कार्यकर्त्यांनी आपली विचारसरणी असलेल्या मतदारांना मतदानासाठी उतरवावे. प्रत्येक बूथवर किमान २० लोकांना भाजपचे सदस्य करा. सदस्य करताना मत मागू नका. सदस्य झाल्यावर त्यांना आपसूक मतदानाचे महत्त्व कळेल, अशा शब्दांत शहा यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला.


फडणवीस यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

दरम्यान, या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कार्यकर्त्यांना सूचना केल्या. ‘अतिविश्वास ठेवू नका आणि गाफील राहू नका,’ असा कानमंत्र देवेंद्र फडणवीस यांनी दिला. ‘आपले विरोधक एकत्रित आले आहेत. ते कुठलीही तडजोड करायला तयार आहेत. सरकारने केलेल्या कामांमुळे लोक आपल्यासोबत आहेत. ३ कोटींहून अधिक लाभार्थी सरकारचे आहेत. त्यांची मते मिळाली तरी सरकार पुन्हा येईल,’ असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post