'मुख्यमंत्री वयोश्री योजने'चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोल्हापूरमधून प्रारंभ



माय नगर वेब टीम 

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना वयोमानापरत्वे येणारे दिव्यांगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी, आवश्यक सहाय्य उपकरणे तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगउपचार केंद्र इत्यादी द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. या मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गारगोटी, कोल्हापूरमधून शुभारंभ करण्यात आला. 


या योजनेंतर्गत  पात्र लाभार्थ्यांना एक वेळ एक रकमी ३००० रुपयांचे मर्यादित अनुदान देय आहे. राज्यात आज अखेर १७ लाख २३ हजार ३०  इतके अर्ज प्राप्त झाले आहेत.  त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र ४० हजार २२० लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी द्वारे निधी वर्ग करण्यात येणार आहे. या योजनेचा गारगोटी या ठिकाणी शुभारंभ झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

या अनुदानातून ज्येष्ठ नागरिकांनी आवश्यक असलेले सहाय्य उपकरणे खरेदी करावे तसेच मनस्वास्थ्य केंद्र युवोपचार केंद्र इत्यादी द्वारे शिबिरामध्ये सहभागी व्हावे असेही आवाहन मुख्यमंत्री महोदय यांनी केले. कोल्हापुरातून सुरू झालेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेची आता राज्यभरातील सर्व जिल्ह्यामधून अंमलबजावणी सुरू होत आहे. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील नामदेव गोपाळ भोसले व कांचन  रेडेकर यांना तीन हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते सुपूर्त करण्यात आला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post