अकोले तालुक्यातील दळणवळणाच्या सुविधा सक्षम करणार - अजित पवार



 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अकोले शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

माय नगर वेब टीम 

शिर्डी : अकोले तालुक्यातील सर्व गाव - वाड्या, वस्त्यांमध्ये दळणवळणाची सुविधा सक्षम करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी‌ आज येथे दिली.

अकोले शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार डॉ. किरण लहामटे, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक सिताराम गायकर,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे, अकोले नगरपंचायत मुख्याधिकारी पंकज गोसावी  आदी उपस्थित होते. 

उपमुख्यमंत्री  पवार म्हणाले, गरिबांना‌ आरोग्यसेवा देण्यासाठी आयुष्यमान भारत योजनेतून पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत केले जातात. उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून या‌ योजनेचा फायदा अकोलेतील नागरिकांना होणार आहे. आदिवासी बांधव हे लोक परंपरा, संस्कृतीचे जतन करतात. आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत लोकाभिमुख योजना राबविण्यात येतात. निळवंडे धरणात नौकाविहार सारखी जलपर्यटन सुविधा देण्याचे काम भविष्यात शासन करणार आहे. 

 राज्यशासनाच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी उठवली‌, त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना फायदा झाला. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत महिलांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत. गरिबांतील घराच्या मुलींना आता उच्च शिक्षण मोफत घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेल्या पैशातून महिलांनी विविध गृहउद्योग सुरू केले आहेत. ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. या योजनेतील ऑक्टोंबर व नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे आठ दिवसांत भगीनींच्या बॅंक खात्यात दिले जातील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी यावेळी दिली. 

राज्यात १ ऑक्टोंबर पासून शेतकऱ्यांच्या दूधाला ३५ रूपये लीटर दर मिळणार आहे. राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांचे १५ हजार कोटींचे वीज बील माफ करण्यात आले आहे. मुख्यमंत्री बळीराजा योजनेत शेतकऱ्यांना मोफत कृषी वीज पुरवठा करण्यात येत आहे. सर्व जाती - धर्मांच्या विकासासाठी शासनाने स्वायत्त संस्थांची निर्मिती केली. त्यातून विविध लोकाभिमुख योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले. 

यावेळी डॉ. लहामटे, श्री. गायकर, यांनीही विचार व्यक्त केले. 

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अकोले येथील महात्मा फुले चौक ते अगस्ती सहकारी साखर कारखाना रस्ता, बस स्थानक, बाजारतळ व नूतनीकरण केलेले अकोले तहसील कार्यालयाचे लोकार्पण तसेच धुमाळवाडी रस्ता व उपजिल्हा शासकीय रुग्णालय‌ कामांचे भूमिपूजन करण्यात आले. 


यावेळी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ पुरस्कार प्राप्त अकोले तालुक्यातील उंचखडक जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांचा तीन लक्ष रूपयांचा धनादेश देऊन उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post