विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला ; मतदान कधी आणि मतमोजणी केव्हा पहा...

 


माय नगर वेब टीम 

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. २५ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील निवडणूक प्रक्रिया पार पाडणं हे निवडणूक आयोगाचं उद्दीष्ट असल्याचं निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेद्वारे जाहीर केलं.


निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, आम्ही काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा दौरा केला. त्या दौऱ्यावेळी आम्ही निवडणुकीची तयारी योग्य प्रकारे झाली आहे की नाही? याची माहिती घेतली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी काही गोष्टी घडल्या होत्या त्या टाळण्यासाठी आम्ही आता पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. लोकांची मतदानासाठी रांग लागते त्यावेळी काही अंतरावर खुर्च्या किंवा बाकं ठेवण्याचा सल्ला आम्ही दिला आहे. ८५ वर्षे आणि त्यावरच्या मतदारांना घरुन मतदान करता येणार आहे. तसेच या मतदारांच्या गोपनीयतेची काळजी आम्ही घेऊ. त्यासंदर्भातली पूर्ण व्यवस्था आम्ही केली आहे.


महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल. तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. अशी ममाहिती राजीव कुमार यांनी दिली.


निवडणूक प्रक्रियेचं संपूर्ण वेळापत्रक

राजपत्र अधिसूचना जारी करण्याची तारीख (Date of Issue of Gazette Notification) – २२ ऑक्टोबर २०२४

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख – २९ ऑक्टोबर २०२४

उमेदवारी अर्ज पडताळणी – ३० ऑक्टोबर २०२४

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – ४ नोव्हेंबर २०२४

मतदानाची तारीख – २० नोव्हेंबर २०२४

मतमोजणीची तारीख – २३ नोव्हेंबर २०२४

निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख – २५ नोव्हेंबर २०२४

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना त्यांची पार्श्वभूमी तीनवेळा वृत्तपत्रात द्यावी लागेल. आम्ही जेव्हा महाराष्ट्रात बैठका घेतल्या तेव्हा आम्ही त्यासंदर्भात कठोर निर्देश राज्य निवडणूक आयोग आणि इतर अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. असंही राजीव कुमार यांनी सांगितलं आहे. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे. त्यात सर्व मतदारांचा सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे मतदारांनी या उत्सवात सहभागी व्हावं आणि आपली लोकशाही बळकट करावी, असंही राजीव कुमार म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post