महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक दिवस! मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्राचा मोठा निर्णय



माय नगर वेब टीम 

नवी दिल्ली: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी शिल्लक असताना केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील कोट्यवधी लोकांची मागणी अखेर आज मान्य झाली आहे. केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. केंद्राने मराठीसह बंगाली, पाली, आसामी, प्राकृत या ५ भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर राजकीय नेत्यांसह साहित्य क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते. या सर्वांचे तसेच सर्व मराठी भाषा बोलणाऱ्यांचे त्यावर प्रेम असणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.


देवेंद्र फडणवीस यांनी दिली पहिली प्रतिक्रिया-

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो. हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्याने पाठपुरावा केला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे. अखेर आज तो सुदिन अवतरला. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठीजनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले-

माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातें ही पैजा जिंके ॥ समस्त मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन!!! अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री. गजेंद्रसिंह शेखावत यांचे आम्ही आभार मानतो. या कामात अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचे साह्य झाले. त्यांचेही मन:पूर्वक आभार!

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post