माय नगर वेब टीम
पारनेर : सन २०२४- २०२५ या वर्षात होणाऱ्या प्रो कबड्डी लिगच्या ११ व्या पर्वाच्या दुसऱ्या पर्वात पंच म्हणून भांडगांव येथील शिक्षक गीताराम सुरेश पवार यांची निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पारनेर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
कबड्डी शिक्षकांच्या जिल्हास्तरीय स्पर्धा अहिल्यानगर येथे पार पडल्या त्यावेळी राहुरीची शान म्हणून कित्येक सामने वन मॅन आर्मी म्हणून ताकदीच्या आणि बुध्दीच्या जोरावर खेचून आणणारा अवलीया अशीही त्यांची ओळख आहे. एकीकडे कब्बडी खेळात पारंगत असताना दुसरीकडे कबड्डी पंचासाठी आवष्यक असलेली परीक्षाही पवार यांनी दिली. त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी अनेक सामन्यांमध्ये पंच म्हणून कामगिरी बजावली. राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्येही त्यांनी पंच म्हणून काम पाहिले. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा रत्न पुरस्कारानेही सन्मानीत करण्यात आले.
कबड्डी स्पर्धेत पंच म्हणून कामगिरी सुरू असताना प्रो कबड्डी लीगच्या ११ व्या पर्वात पंच म्हणून काम करण्याची संधी त्यांना १४ ऑक्टोबर रोजी मिळाली. अर्थात ही संधी प्राप्त करताना त्यांना पंधरा दिवसांच्या दिव्यातून जावे लागले आणि त्यांनी या यशाला गवसणी घातली. पवार यांनी आजवर या खेळासाठी केलेल्या परीश्रमांचे हे फळ म्हणावे लागेल. लवकरच १५ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान पार पडणाऱ्या प्रो कबड्डीच्या लिगमध्ये दुरदर्शनवर गीताराम पवार हे पंच म्हणून काम करताना पहावयास मिळणार आहेत. पवार यांनी मिळविलेल्या या उपलब्धीचे पारनेर तालुक्यातून कौतुक करण्यात येत आहे.
खा. लंके यांना आनंद
११ व्या प्रो कबड्डी लिगच्या दुसऱ्या पर्वात पंच म्हणून भांडगांव येथील शिक्षक गीताराम सुरेश पवार यांची निवड झाल्याबद्दल अहमदनगर जिल्हा हौशी कब्बडी सांघाचे जिल्हाध्यक्ष खासदार नीलेश लंके यांनी आनंद व्यक्त करत पवार यांचे अभिनंदन केले आहे. संघाचे सचिव प्रा. शशिकांत गाडे यांनीही पवार यांचे अभिनंदन केले.
Post a Comment