उमेद अभियानातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरु



*राज्यभरातील महिला बचत गट चळवळीचे कामकाज झाले पूर्णपणे ठप्प

माय नगर वेब टीम 

अहमदनगर -  शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील  महिलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात कार्यरत अधिकारी, कर्मचारी तसेच गावागावात काम करणाऱ्या कर्मचारी महिलांच्या विविध मागण्या प्रलंबित असून त्या सोडविण्यासाठी नगर जिल्ह्यासह राज्यभरातील सर्व महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी गुरुवार (दि.३) पासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यभरातील महिला बचत गट चळवळीचे काम ठप्प झाले आहे.  

उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु असून शुक्रवारी (दि.४) नगर पंचायत समिती कार्यालयात अभियानातील कार्यरत कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. यामध्ये संघटनेचे जिल्हाध्यक्ष व राज्य सचिव बाबासाहेब सरोदे, सदस्य तौफिक सौदागर, सोमनाथ जगताप, पंढरीनाथ ढाकणे, वैभव धनवटे, अतुल चाटे, वैभव मोहिते, महिला आघाडीच्या नगर तालुकाध्यक्षा पुष्पांजली दळवी, सचिव अनिता गायकवाड, रुपाली नवले, सोनाली शिंदे, पुनम देवढे, मंजुश्री करांडे, रोहिणी आगरकर, समीना शेख यांच्या सह तालुक्यातील सीआरपी, कृषी सखी, पशु सखी असे १८० अधिकारी, कर्मचारी या काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. 

तसेच नगर जिल्ह्यात या अभियानात १ हजार ७६० सीआरपी महिला व ९३ प्रभाग समन्वयक, तालुका समन्वयक व इतर तांत्रिक कर्मचारी कार्यरत असून ते सर्व या आंदोलनात उतरले असल्याचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब सरोदे यांनी सांगितले.    

राज्यभरात या  अभियानाच्या माध्यमातून तब्बल ३००० अधिकारी व कर्मचारी मागील दहा वर्षापासून कंत्राटी स्वरूपाने काम करीत आहेत. सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागील तीन वर्षापासूनच्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी शासन दरबारी वेळोवेळी मागणी करण्यात आली होती. परंतु मागणी मान्य न केल्यामुळे दि.१० ते १२ जुलै २०२४ दरम्यान आझाद मैदान मुंबई येथे अधिवेशन कालावधीत आंदोलन करण्यात आले. 

यावेळी मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र तब्बल अडीच महिने होऊनही मागण्या मान्य न झाल्यामुळे उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या सर्व महिला, कार्यरत केडर, कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दि.२५ सप्टेंबर पासून गाव स्तरापासून ते राज्य स्तरावर आंदोलन सुरू केले. दि.२६ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. तरीही मागण्या मान्य न झाल्याने गुरुवार (दि.३) पासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यभरातील महिला बचत गट चळवळीचे काम ठप्प झाले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post