माय नगर वेब टीम
संगमनेर : लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या विचाराला संगमनेर तालुक्याने नेहमीच साथ दिली. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पिंपळगाव कोंझीरा गावाने त्यांच्या नावाने उभारलेले सभागृह हे सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरेल असे भावनीक उद्गार महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले.
पिंपळगाव कोंझीरा येथे उभारण्यात आलेल्या सभागृहास लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील असे नाव देण्यात आले असून, सभागृहातील तैलचित्राचे अनावरण मंत्री ना.विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी स्थानिक ग्रामस्थ आणि पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्व.अशोकराव मोरे यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पाजंली अर्पण करुन मंत्री ना.विखे पाटील यांनी अभिवादन केले.
आपल्या भाषणात मंत्री ना.विखे पाटील म्हणाले की, लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी विचारांच्या आधारावर कार्यकर्त्यांचा समुह जमा केला होता. शेतक-यांच्या प्रश्नांबरोबरच हक्काच्या पाण्यासाठी त्यांनी उभा केलेला संघर्ष हा काळाच्या ओघात देशाच्या धोरणामध्ये रुपांतरीत झाला. कॉम्रेड सहाणे मास्तरांसारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांना सदैव साथ दिली. यासर्व वाटचालीत काही तरुण कार्यकर्तेही जोडले गेले. यामुळेच विचाराला साथ देणा-या कार्यकर्त्यांची फळी आजही टिकून राहीली याचा निश्चित अभिमान वाटतो.
पिंपळगाव कोंझीरा गावाने तर खासदार साहेबांवर सदैव प्रेम केले. त्यांच्या राजकीय, सामाजिक वाटचालीत या गावाचे योगदान खुपच मोठे राहीले. खासदार साहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी विकसीत झालेल्या सभागृहाला त्यांचे नाव दिल्याबद्दल ग्रामस्थांप्रती कृतज्ञता व्यक्त करुन, मंत्री विखे पाटील म्हणाले की, ग्रामीण विकासाच्या दृष्टीने हे सभागृह सर्वांसाठी उपयुक्त ठरेल. सामाजिक उपक्रमातून गावाचे गावपणही निर्माण करण्यासाठी विचारांच्या आधारावर विकास साध्य करण्याचे आवाहन त्यांनी ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांना केले.
पिंपळगाव कोंझीरा गावात आल्यानंतर स्व.अशोकराव मोरे यांची आठवण होतेच, राजकारणात ते कुठेही असले तरी, एक व्यक्तिगत मित्र म्हणून त्यांचा आणि माझा स्नेह खुप वेगळा होता. राजकारणातील सुसंस्कृतपणा जोपासणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख सदैव स्मरणात राहणारी आहे. अशा शब्दात मंत्री ना.विखे पाटील यांनी आठवणींना उजाळा दिला. संजय मोरे यांच्यासह मित्र परिवाराने ना.विखे पाटील यांचा गावाच्या वतीने सत्कार केला.
याच परिसरात निळवंडे कालव्यावर उभारण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मागणीपुर्वीच यापुलाचे काम पुर्ण करण्याच्या सुचना आपण जलसंपदा विभागाला दिल्या होत्या. अतिशय कमी कालावधीत या पुलाचे काम मार्गी लागले असून, याभागातील दळणवळणासाठी या जलसेतूचा निश्चित उपयोग होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Post a Comment