राज्यात मुख्यमंत्री म्हणून जनतेची अधिक पसंती कोणाला? सी-वोटरचा सर्व्हे आला समोर…..

 


माय नगर वेब टीम 

मुंबई : महाराष्ट्रात निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान 20 नोव्हेंबरला होणार आहे. तर, निवडणकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर आता बंडखोरांना शांत करण्याचे प्रयत्न राजकीय नेत्यांकडून आणि पक्षांकडून केले जात आहेत. या दरम्यान महाराष्ट्रातील जनतेला मुख्यमंत्री म्हणून कुणाला पाहायच, याबाबात एक सर्व्हे समोर आला आहे. सी वोटरनं तो सर्व्हे केला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने (एमव्हीए) कोणालाही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित केलेले नाही. सीएम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कामगिरीच्या जोरावर महायुती जनतेत आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडी सामूहिक नेतृत्वाखाली निवडणुका लढवत आहे. या सगळ्यात सी-व्होटर सर्व्हेमध्ये विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती म्हणून पुढे आले आहेत. सर्वेक्षणात त्यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह लोकप्रियतेच्या बाबतीत उद्धव ठाकरे यांना मागे टाकले आहे.

महाराष्ट्रात गेल्या 2 ते 3 वर्षांत राजकारणात बरीच उलाथापालथ पहायला मिळाली.  सत्तापालट झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे लोकप्रिय झाले आहेत. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जनतेला मुख्यमंत्री म्हणून कोण हवे आहे याबाबत एक सर्व्हे करण्यात आला. सी-वोटर सर्व्हेनुसार एकनाथ शिंदे यांना 27.5 टक्के मते मिळाली. 10.8 टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची निवड केली आहे.

शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांना सर्वेक्षणात फडणवीस यांच्यापेक्षा जास्त मते मिळाली आहेत. 22.9 टक्के लोकांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पाहायचे असल्याचे सांगितले. 3.1 टक्के लोकांनी अजित पवार यांनाच आपली पसंती असल्याचे घोषित केले. सी व्होटरच्या सर्वेक्षणात 26.4 टक्के लोकांनी कोणतेही मत व्यक्त केले नाही.

दरम्यान, भाजपने निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढण्याची घोषणा केली असली, तरी महायुतीला विजय मिळाल्यास मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. याचप्रमाणे महाविकास आघाडीमध्येही मुख्यमंत्री पदासाठी कोणत्या नावाची घोषणा होईल, हे निश्चित झालेले नाही. सध्या राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरु असून आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सगळेच पक्ष तयारी करत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post