भाजपाचा राज्यात सभांचा धडाका ! पंतप्रधान मोदी, अमित शहांसह बड्या नेत्यांच्या १00 हून अधिक सभा

 


माय नगर वेब टीम 

मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यावी प्रक्रिया मंगळवारी पूर्ण झाली. आता सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारावर लक्ष केंद्रीत केले आहे. भाजपच्या वतीने विधानसभा निवडणूक प्रचाराचा मेगा प्लॅन तयार केला आहे.

भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बडे नेते प्रचाराच्या रणधुमाळीत उतरणार आहेत. मोदी यांच्याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील अनेक जाहीर सभांना संबोधित करणार आहेत.

भारतीय जनता पार्टीच्या सुत्रांनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई-कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात एकूण 8 सभा घेणार आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भापजचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही जास्तीत जास्त सभा घेण्याची जबाबदारी असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपकडून विधासनभा निवडणुकीच्या प्रचारासाठी 100 हून अधिक सभांचे नियोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एकूण 8 प्रचार सभा घेणार असून गृहमंत्री अमित शाह 20 सभांना संबोधित करणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 40 सभा होणार आहेत.

तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वाधिक 50 प्रचार सभा घेणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष 40 तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 15 सभांना संबोधित करणार आहेत.

दरम्यान, या सभा राज्यातील महत्त्वाच्या मतदारसंघांत होणार आहेत. या सभांची तारीख अद्याप समोर आलेली नाही. मात्र, दिवाळीनंतर भाजपकडून प्रचाराचा नारळ फोडला जाणार असल्याची चर्चा आहे.

पंतप्रधान मोदी ७ ते १४ नोव्हेंबर दरम्यान

पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर महाराष्ट्रात तळ ठोकून असणार आहेत. या 8 दिवसांत ते विविध मतदारसंघात जाहीर सभा घेतील. पंतप्रधान मोदी 14 नोव्हेंबरपासून परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे प्रचारासाठी फारसा वेळ नसणार.

त्यामुळे या 8 दिवसांत मोदींच्या जास्तीत जास्त सभा घेण्यावर महायुती भर देईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ भाजपच नाही तर महायुतीच्या घटक पक्षातील उमेदावारांच्या प्रचारासाठी सुद्धा सभा घेणार आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post