मोठी बातमी ; महाविकास आघाडीतील जागा वाटपावर अखेर तोडगा! जाणून घ्या कोणाला किती जागा…



माय नगर वेब टीम 

मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी (MVA) मधील जागा वाटपावर अखेर सहमती झाली आहे. मंगळवारी रात्री उशिरा तब्बल चार तास चाललेल्या बैठकीनंतर जवळपास वादाचे सर्व मुद्दे मार्गी लागले आहेत. सध्या फक्त 4-5 जागांवर पेच असून, ज्यावर बुधवारी (आज) तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे. यानंतर तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अधिकृतरित्या जागा वाटप जाहीर करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

काँग्रेसला सर्वाधिक जागा…

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वाधिक जागांवर आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस 104 ते 106 जागांवर लढणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाला 92 ते 96 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर शरद पवार यांच्या गटातील राष्ट्रवादीला 85 ते 88 जागा मिळतील अशी चर्चा आहे. याखेरीज, समाजवादी पक्षासारख्या घटक पक्षांना महाविकास आघाडीचे तीन प्रमुख घटक पक्ष आपापल्या कोट्यातून काही जागा देतील.

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सांगितले की, अजूनही 4-5 जागांवर चर्चेची गरज आहे. बुधवारी या जागांवर चर्चा होईल आणि संध्याकाळपर्यंत सर्व स्पष्ट होईल अशी आशा आहे.

विदर्भातील जागांचा तिढा सुटला?

विदर्भातील काही जागांवर तिढा होता, परंतु आता तो जवळपास सुटला आहे. नागपूर पश्चिम, कामठी, गोंदिया, आणि भंडारा या जागांवर काँग्रेसचे उमेदवार असतील. शिवसेना उद्धव ठाकरे गटाला रामटेक आणि आणखी 9 जागा मिळतील, तर राष्ट्रवादीला विदर्भातील 11 ते 12 जागा मिळण्याची शक्यता आहे.

महायुती विरुद्ध महाविकास आघाडीची थेट लढत

या निवडणुकीत लढत दोन प्रमुख आघाड्यांमध्ये रंगणार आहे – सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी. महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी (BJP), एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट सामील आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला वरचढ ठरली होती, लोकसभेच्या 48 पैकी 30 जागांवर आघाडीच्या अधिकृत उमेदवारांनी विजय मिळवला होता. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी लोकसभेची पुनरावृत्ती करण्याच्या प्रयत्नात आहे, तर महायुतीकडून हे चित्र बदलण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post