मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटला; एकनाथ शिंदे यांनीचं केली मोठी घोषणा...

 


माय नगर वेब टीम 

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मुख्यमंत्रीपदावरून मोठा पेच निर्माण झाला होता. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी अग्रही असल्याचं बोललं जात होतं. त्यांच्या नाराजीच्या चर्चा देखील समोर येत होत्या. मुख्यमंत्रीपदावरून देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यात रस्सीखेच चालू असल्याचं म्हटलं जातं होतं. मात्र, या सर्व चर्चा एकनाथ शिंदे यांनी आज खोट्या ठरवल्या. “मी नाराज नसून, आम्ही रडणारे नाही, तर लढणारे आहोत. तसंच, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय भाजपाने घ्यावा, तो माझ्यासह शिवसेनेला मान्य असेल”, असं शिंदे यांनी स्पष्ट केलं. त्यांनी ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषेद घेऊन त्यांची नव्या सरकारबाबतची भूमिका स्पष्ट केली.


एकनाथ शिंदे म्हणाले, “राज्यात महायुतीचं बहुमताचं सरकार आलं आहे. तुम्ही प्रसारमाध्यमं आम्हाला विचारताय की सत्तास्थापनेचं घोडं कुठे अडलंय? मला प्रसारमाध्यमांसह राज्यातील जनतेला सांगायचं आहे की सत्तास्थापनेचं घोडं कुठेही अडलेलं नाही. मी मनमोकळा माणूस आहे. मी कुठेही काहीही धरून ठेवलेलं नाही. मी कुठलीही गोष्ट ताणून धरणारा माणूस नाही. मला इतर सर्व पदांपेक्षा लाडक्या बहिणींचा सख्खा लाडका भाऊ हीच ओळख जास्त प्रिय आहे. त्यामुळे मी स्वतः काल (२६ नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला. त्यांना सांगितलं की सरकार बनवताना तुम्हाला माझ्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही. त्यामुळे माझ्याबद्दल मनात कुठलाही किंतू आणू नका. अडीच वर्षांपूर्वी तुम्ही आम्हाला मदत केली. तुमच्या पाठिंब्यावर आम्ही सरकार बनवलं. त्यामुळे मला अडीच वर्षे राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्यासाठी मी आभारी आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला बहुमत मिळालं आहे. यावेळी माझ्यामुळे महायुतीच्या सत्तास्थापनेत कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही”.


नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेंची भूमिका काय असेल?

एकनाथ शिंदे म्हणाले, “राज्यात आता महायुतीचा मुख्यमंत्री होणार आहे आणि माझा त्याला पूर्ण पाठिंबा असेल. भाजपाच्या उमेदवाराला माझं समर्थन असेल. मी महायुतीला पाठिंबा द्यायलाच इथे बसलोय”. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की नव्या मंत्रीमंडाळात तुमचं काय स्थान असेल? तुम्ही आता उपमुख्यमंत्र्यांच्या रुपात दिसणार का? तुम्ही गृहमंत्रीपद मागितल्याची चर्चा आहे. यावर, शिंदे म्हणाले, “उद्या दिल्लीत, आमची तिन्ही पक्षांच्या नेत्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर बैठक होणार आहे. या बैठकीत या सगळ्यावर चर्चा होईल. त्या चर्चेतून सगळे प्रश्न सुटतील. उपमुख्यमंत्री होणार की आणखी काही ते उद्या ठरेल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post