माय नगर वेब टीम
मुंबई - विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेडमध्ये महायुतीचे उमेदवार राम शिंदे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पवार यांच्यात चुरशीची लढत झाल्याचे पाहायला मिळाले. यात रोहित पवार थोड्या मतांच्या फरकाने विजयी झाले. तर राम शिंदे यांचा पराभव झाला. दरम्यान, आज सकाळी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी अजित पवार आणि रोहित पवार यांची भेट झाली होती.
यावेळी ‘रोहित थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं, दर्शन घे काकांचं’, असा मिश्कील टोला अजित पवारांनी लगावला. यावर आता राम शिंदे यांनी प्रतिक्रिया देत अजित पवार यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
काय म्हणाले राम शिंदे ?
“कर्जत जामखेडमध्ये मी कटाचा बळी ठरलो आहे. हे आज दिसून आलंय. मी महायुतीचा धर्म पाळण्यासाठी अजित पवारांकडे मागणी करत होतो. मी सभेला आलो असतो तर काय झालं असतं असं ते बोलले म्हणजे हा सुनियोजित कट होता. राजकीय सारीपाटात मी बळी ठरलोय. यासंदर्भात मी अगोदरच सांगितलं,” असे राम शिंदे यांनी म्हंटले आहे.
पुढे ते म्हणाले, “माध्यमांमध्ये बोलण्याची माझी इच्छा नव्हती, मात्र अजित पवार बोलले त्यामुळे बोलतोय. मला वाटतं की कौटुंबिक कलाह दरम्यान काही करार झाले, त्याचे प्रत्यय कर्जत जामखेडमध्ये जाणवला शरद पवार विधानसभेत पोहोचले तेव्हा माझा जन्म देखील झाला नव्हता. मोठी बलाढ्य शक्ती माझ्यासमोर होती. माझा सहावा क्रमांक लागतोय जो सर्वाधिक मतं घेऊन पराभूत झाला. महायुतीच्या लोकांबरोबर असं होत असेल तर बरोबर नाही. मतमोजणीसंदर्भात तक्रार केली आहे, मात्र ती फेटाळण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्याकडे पुन्हा अर्ज करणार असून ते काय निर्णय घेतात त्यानंतर पुढे कारवाई करणार आहे.”
अजित पवार-रोहित पवारांच्या भेटीदरम्यान नेमकं काय घडलं ?
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्त चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या प्रीतीसंगम या समाधीस्थळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार दाखल झाले होते. त्यावेळी तिथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे देखील दाखल झाले. या भेटीत अजित पवारांनी रोहित पवारांना मिश्किल टोला लगावला. ‘ढाण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं,’ असा अजित पवारांनी रोहित पवारांना मिश्कील टोला लगावला. यावर सभा झाली असती तर निकाल वर-खाली झाला असता,’ अशी कबुली रोहित पवारांनी दिली.
Post a Comment