माय नगर वेब टीम
अहिल्यानगर - महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून गावातील ११ रस्ता काँकरीटीकरण कामांना प्रशासकीय मान्यता देणेकरिता सदर कामाच्या अंदाजपत्रकीय रक्कमेच्या तीन टक्के प्रमाणे ५ लाख ५० हजारांची लाच तहसीलदारांसह स्वतः साठी मागणाऱ्या पारनेर तहसील कार्यालयातील अव्वल कारकून सुनिल बाबुराव फापाळे (रा. बेट वस्ती, टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर) यांच्यावर नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
यातील तक्रारदार यांचे गावातील ११ रस्ता काँकरीटीकरण कामाचा ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला होता. सदर कामाचे ठराव कागदपत्रासाह तहसीलदार तथा गट कार्यक्रम अधिकारी म. ग्रा. रो. ह. यो. पारनेर यांना सादर केले होते. त्यानंतर मा. तहसीलदार पारनेर यांनी सदर कामाचे अंदाजपत्रक तयार करून व तांत्रिक मान्यता देणेकारिता उप अभियंता, जि. प. सा.बां. उप विभाग, पारनेर यांना पत्र दिले होते. त्यावरून उप अभियंता, जि. प. सा.बां. उप विभाग, पारनेर यांनी सदर कामाचे अंदाजपत्रक तयार करून व तांत्रिक मान्यता देऊन प्रशासकीय मान्यता करिता तहसीलदार पारनेर यांना सादर केले होते.
११ कामाची प्रशासकीय मान्यता देणेकरिता सदर कामाच्या अंदाजपत्रकीय रक्कमेच्या तीन टक्के प्रमाणे रक्कमेची लाच मागणी केले बाबतची तक्रार दि. १५ ऑक्टोबर रोजी नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार दि. १५ ऑक्टोबर रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान अव्वल कारकून सुनिल बाबुराव फापाळे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचे गावातील ११ रस्ता काँक्रीटकरण कामाच्या अंदाजपत्रकीय रक्कमेच्या दोन टक्के प्रमाणे स्वतः करिता व तहसीलदार यांचे करिता ५ लाख ५० हजारांची लाच मागणी करून तडजोडीअंती ४ लाख रुपये लाचेची मागणी केली व सदर लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. म्हणून फापाळे यांचे विरुद्ध पारनेर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस उप अधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. संतोष शिंदे, महिला पो.हे.कॉ. राधा खेमनर, पो.ना. चंद्रकांत काळे, पोलिस अंमलदार रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, चालक पो.हे.कॉ. हारून शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Post a Comment