पारनेरमधील 18 बूथवर संशय; लंके यांचा ईव्हिएम पडताळणीसाठी अर्ज; भरले इतके रुपये



८ लाख ४९ हजार ६०० रूपये शुल्क जमा

 माय नगर वेब टीम 

पारनेर :    पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील १८ बुथवरील ईव्हिएम मशिनमधील मतदानाची पडताळणी करण्याची मागणी करणारा अर्ज महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांच्या वतीने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांच्याकडे गुरूवारी सुपूर्द करण्यात आला. या पडताळणीसाठी ४७ हजार ६०० रूपयांप्रमाणे १८ बुथसाठी आवष्यक असलेले ८ लाख ४९  हजार ६०० रूपये इतके शुल्क लंके यांच्या वतीने शासनाच्या कोषागारात जमा करण्यात आले आहे. 

     गेल्या २३ नोव्हेंबर रोजी राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी घेण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी करण्यात आली. पारनेर-नगर मतदारसंघातील मतमोजणी करण्यात आली त्यावेळी महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार काशिनाथ दाते व महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांच्यात चुरशीची लढत होईल काशिनाथ दाते यांनी या निवडणूकीत अल्पशा मतांनी बाजी मारली. मतमोजणीनंतर राणी लंके समर्थकांकडून ईव्हिएमच मशिनसंदर्भात शंका घेण्यात येत होत्या. खा. नीलेश लंके यांनीही दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना ईव्हिएम मशिनवर शंका उपस्थित करत पोष्टल मतदानाचा जो कल असतो तोच कल मतदान यंत्रातील मतांमध्येही असतो असा अनुभव असताना यंदाच्या निवडणूकीत हा कल कसा बदलला गेला असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. या पार्श्वभुमीवर उमेदवार राणी लंके यांच्या वतीने ठराविक मतदान केंद्रावरील मतांची फेर मोजणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

४५ दिवसांनी होणार पडताळणी

लोकसभा, विधानसभा निवडणूकीतील क्र.२ व क्र.३ वरील पराभूत उमेदवारांना ईव्हिएम पडताळणी करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. निवडणूकीचा निकाल  जाहिर झाल्यानंतर  सात दिवसांच्या आत पराभूत उमेदवारांना ईव्हीएम पडताळणी करण्याची मागणी करता येते. त्यानुसार राणी लंके यांच्या वतीने गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे ही मागणी करण्यात आली. निकालानंतर ४५ दिवसांनी ही पडताळणी करण्यात येणार आहे.  

या बुथवरील मतांची होणार पडताळणी 

क्र.२ नागापुरवाडी, क्र. २८ वनकुटे, क्र.३० पठारवाडी, क्र. ३८ देहरे, क्र.५० सुतारवाडी, क्र. ९२ भाळवणी, क्र.९४ भाळवणी, क्र.९५ भाळवणी, क्र.११४ वडगांव गुप्ता, क्र.११५ निंबळक, क्र.११७ निंबळक, क्र.२६५  सुपा, क्र. २६७ सुपा, क्र.२६८ सुपा, क्र.२९३ वाळवणे, क्र. ३१० निघोज, क्र ३१३, निघोज, क्र. ३५९ वाडेगव्हाण.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post