ज्ञानेश्वर उंडे यांची तक्रार
माय नगर वेब टीम
पारनेर : दि. ४ डिसेंबर २०२२ रोजी दिपक सुदाम उंडे याचे अपहरण करून त्याचा घातपात केल्याप्रकरणी काशिनाथ दाते यांच्यासह त्यांच्या परिवारातील सदस्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी दिपक उंडे यांचे भाऊ ज्ञानेश्वर उंडे यांनी पोलीस अधिक्षकांकडे केलेल्या तक्रारीत केली आहे.या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार क्राईम ब्रँचकडे गुन्हा वर्ग करण्यात आला असून त्या आधारे या आरोपींना अटक करावे असे ज्ञानेश्वर उंडे यांचे म्हणणे आहे.
पोलीस अधिक्षकांकडे देण्यात आलेल्या तक्रारीत नमुद करण्यात आले आहे की, दि.४ डिसेंबर रोजी डॉ. प्रदिप दाते यांचा फोन आल्यानंतर दिपक वाढदिवसाला जाण्यासाठी घराबाहेर पडला. त्यानंतर तो परत आलाच नाही. तो घरी न परतल्याने त्याच्या फोनवर संपर्क करण्यात आला असता फोन बंद होता. दिपक बाहेर पडण्यापूव डॉ. प्रदीप दाते यांचा फोन आला असल्याने डॉ.दाते यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली तसेच खोटी माहीती देऊन दिशाभुल केल्याचे या तक्रार अर्जात नमुद करण्यात आले आहे.
डॉ. दिलीप दाते यांना दिपक बेपत्ता झाल्याबाबत पोलीसांकडे तक्रार करू का अशी विचारणा केली असता तक्रार करू नका, दिपक यास वैभव गुंजाळ याने निवडुंगेवाडी रस्त्यावर पाहिले असल्याचे सांगितले. वैभव व दिपक यांच्यात फोनवर झालेल्या संभाषणाचे रेकॉडींगही डॉ. दाते यांनी आपणास ऐकविल्याचे ज्ञानेश्वर उंडे यांनी तक्रारीत नमुद केले आहे.
डॉ.प्रदीप दाते यांच्या पत्नी दिपाली दाते यांनीही दिपक यास टाकळी ढोकेश्वर येथे हॉस्पिटलसमोरून जाताना पाहिल्याचे डॉ. प्रदीप यांनी सांगितले होते. अनेक वेळा डॉ. प्रदिप दाते यांनी दिपकबाबत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. दिपक हा शिवसेनेच्या युवा सेनेचा संघटक होता. काशिनाथ दाते हे शिवसेना पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य होते. त्यामुळे काशिनाथ दाते यांच्यावर आमचा पुर्ण विश्वास होता, त्यांच्यावर आम्ही अंध विश्वास ठेवला असेही या तक्रारी म्हटले आहे.
दिपक बेपत्ता झाल्यापासून आम्ही अनेकदा काशिनाथ दाते यांच्याकडे गेलो. त्यावेळी त्यांनी कोणतेही सहकार्य केले नाही. दिपक याची बहिण ज्योती हारदे ही चौकशीसाठी पोलीस ठाण्यात गेली असता काशिनाथ दाते यांनी घरी येऊन या पोरीचे पोलीस ठाण्यात काय काम आहे ? कोणीही पोलीस ठाण्यात जायचे नाही.गेल्यास गाठ माझ्याशी आहे. मी दिसतो तसा भोळा चेहरा नाही, माझा खरा चेहरा तुम्हाला माहीती नाही. प्रेमात सांगतो नाहीतर मला माझया पध्दतीने तुमचा बंदोबस्त करावा लागेल अशी धमकीही काशिनाथ दाते यांनी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्या नातेवाईकांमार्फत आजही धमक्या देण्यात येत असल्याचे ज्ञानेश्वर उंडे यांचे म्हणणे आहे.
राजकीय दबावातून अटक होऊ दिली नाही
दिपक उंडे बेपत्ता झाल्याप्रकरणाची संपूर्ण माहीती तसेच पुरावे पोलीसांना देण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करून काही आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणात डॉ. प्रदीप दाते हे देखील आरोपी होते. राजकीय दबावातून डॉ. प्रदीप दाते यास अटक करू दिली नाही. त्यानंतर प्रदीप दाते यांने अटकपूर्व जामीन मिळविला. पुरावे देण्यात येऊनही राजकीय दबाव असल्याने पोलीसांकडून आम्हला कोणतीही मदत मिळत नसल्याचीही ज्ञानेश्वर उंडे यांची तक्रार आहे.
दाते कुटूंबियांसमवेत दिपकच्या पत्नीचाही सहभाग
दिपक बेपत्ता झाल्यानंतर सहा महिन्यात काशिनाथ दाते यांनी त्यांच्या जवळच्या नातेवाईकासोबत दिपकची पत्नी जयश्री हीचे लग्न लाऊन दिले. ती दोन जुळया मुलींसह दुसऱ्या पतीसोबत नांदत आहे. लग्नापूर्वी नातेवाईकांमार्फत काशिनाथ दाते यांच्याशी नातेवाईकांकडून संपर्क करून जयश्री हिचे दुसरे लग्न करू नका असा निरोप दिला असता दाते यांनी तुम्ही केस पुर्णपणे मिटवून घ्या, नाहीतर मी माझ्या नातेवाईकांसोबत तिचे लग्न लाऊन देईल असे सांगितले होते. या गुन्हयाबाबत जयश्री हिचाही दाते कुटूंबियांसमवेत मोठा सहभाग असल्याचे अम्हाला समजले असल्याचेही ज्ञानेश्वर यांचे म्हणणे आहे.
आमच्या कुटूंबावर दबाव आणला जातोय
आमच्या गरीब कुटूंबावर वेळोवेळी राजकीय दबाव आणण्यात येत असून आमच्या नावाची बदनामी करण्यात येत आहे. माझा भाऊ दिपक याच्या खुनाशी डॉ. प्रदीप दाते,त्याची पत्नी दिपाली दाते यांचा सहभाग असून हे कटकारस्थानासाठी मदत करणारे काशिनाथ दाते यांना या गुन्हयात आरोपी करून आम्हाला न्याय द्यावा, या गुन्हयाचा तपास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार क्राईम ब्रँचकडे वर्ग करण्यात आला असून या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी ज्ञानेश्वर उंडे यांनी केली आहे.
Post a Comment