डोक्यात काही हवा असेल तर काढून टाका!: उमेदवार राणी लंके यांनी विरोधकांना फटकारले



पुणेवाडीच्या भैरवनाथ देवस्थान येथे प्रचाराचा नारळ 

माय नगर वेब टीम 

पारनेर :  माझे शिक्षण, माझ्या भाषणावर निवडणूकीच्या प्रचारात टीका केली जात आहे. कुणाच्या डोक्यात काय हवा आहे हे मला सांगता येत नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा नियोजन समितीमध्ये मी काम केले आहे. त्या माध्यमातून  मोठा निधी आणला आहे. माझ्याकडे अनुभवाची शिदोरी असून कोणाच्या डोक्यात काही हवा असेल तर ती काढून टाका, २३ तारखेनंतर मी कसे काम करते हे  कृतीतून सिध्द करेल असे सांगत महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांनी विरोधकांना फटकारले. 

   लंके यांच्या प्रचारार्थ पुणेवाडी येथे कान्हूरपठार गट व पारनेर शहरातील प्रचाराचा नारळ पुणेवाडीच्या भैरवनाथ मंदिरात फोडण्यात आला, त्यावेळी त्यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. यावेळी कान्हूर पठार जिल्हा परिषद गट तसेच पारनेर शहरातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. 

     यावेळी बोलताना लंके म्हणाल्या, प्रचारानिमित्त प्रत्येक गावात घेण्यात आलेल्या घोंगडी बैठकींना मोठा प्रतिसाद मिळाला. ही निवडणूक जनतेने हाती घेतली असून उमेदवारही जनतेनेच निवडला आहे. खा. लंके यांनी आमदार असताना त्यांनी साडेचार वर्षात दोन हजार कोटींचा निधी आणला. उर्वरीत कामांची पुर्तता भविष्यकाळात होणार आहे. पंचायत समितीच्या निवडणूकीपासून मला महिलांची साथ मिळते आहे. अर्ज दाखल करताना मोठया संख्येने महिला होत्या. त्याचे कारण एक महिला भगिनी आमदार होणार याचा त्यांचा आनंद आहे. शरद पवार यांनी आरक्षण दिले त्याचा फायदा घेतला पाहिजे. महिलांना सक्षम करण्यासाठीच मी आमदार होणार आहे.  महिलेच्या हाती रोजगार कसा मिळेल. त्यांना व्यासपीठ कसे मिळेल यासाठी मी पुढाकार घेणार आहे.  घोंगडी बैठकांमध्ये महिला बोलू लागल्या, व्यासपीठावर बसू  लागल्या असल्याने महिलांच्या सक्षमीकरणाची ही सुरूवात झाल्याचे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही असे लंके यांनी सांगितले. 

   लंके पुढे  म्हणाल्या, मी मोठ्या मताधिक्क्याने विजयी होणारच आहे. प्रश्न फक्त मताधिक्क्याचा आहे. पारनेर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असता मात्र समोरच्या व्यक्तिला मागे खेचण्यासाठी ही योजना रोखण्यात आली. कदाचित पाण्याचा प्रश्न माझ्याकडून सोडला जावा हे माझ्या नशिबात असावे. मतांची कडकी झाल्यानंतर बहिण लाडकी झाली. यापूर्वी लाडकी बहिण कुठे होती ? दुसरीकडे महागाई वाढवून  महिलांच्या हातून दिलेले पैसे काढून घेण्यात आल्याचे टिकास्त्र लंके त्यांनी सोडले.

 प्रवाहासोबत या आपला विजय निश्चित आहे फक्त मताधिक्क्य वाढवायचे आहे. आपले मत विकासाला मत दिले पहिजे इतरांना मत देऊन मत वाया जाऊ देऊ नका. प्रवाहाच्या दिशेने मतदान करा. जास्तीत जास्त निधी मिळविल्यानंतर मतदासंघाचा विकास होणार आहे. ज्या गावात जास्त लिड त्या गावाला बक्षिस आणि सर्वाधिक निधी देण्यात येणार आहे. 

राणी लंके 

महाविकास आघाडीच्या उमेदवार   

सुजयदादांची शांती करावी ! 

मा. खा. डॉ. सुजय विखे हे सध्या करत असलेली वक्तव्ये करत आहेत ते पाहता राधाकृष्ण विखे यांनी सुजय दादांची शांती केली तर  बरे होईल. त्यांनी नाशिक येथे नारायण नागबळीही करावा. ते दशक्रिया विधीला कावळयाच्या आगोदर येणार असे त्यांनी जाहिर केले होते. विखे यांचे  सगळे पक्ष झाले आहेत. त्यांचा आता एकच पक्ष राहिलाय. तो म्हणजे पितृपक्ष आणि चिन्ह कावळा असे सांगत यशवंत गोसावी यांनी विखे यांच्यावर उपहासात्मक टीका केली.

आलीबाबा चाळीस चोर ! 

शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण दिले त्यामुळे या व्यासपीठावर महिलांची संख्या लक्षणीय दिसते आहे. एकीकडे लाडकी बहिण योजनेतून पंधराशे रूपये दिले तर दुसरीकडे महागाई वाढवून हे पैसे काढून घेतले. आलिबाबा चाळीस चोर अशी या महायुती सरकारची अवस्था आहे. या राज्यातील अनेक उद्योग गुजरातला नेण्यात आल्याने बेरोजगारी वाढली आहे. राज्यात महिलांवर अत्याचार होत आहेत. 

सिताराम काकडे

जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post