संदेश कार्ले यांना मोठा दिलासा; 'या' संघटनेने दिला जाहीर पाठिंबा



माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची वेळ जशी जवळ येत चालली आहे तशा पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात पडद्याआड आणि पडद्यासमोर मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यातच नुकताच अपक्ष उमेदवार विजय औटी यांनी काशिनाथ दाते यांना पाठिंबा दिला आहे. तर आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख, जिल्हा परिषद सदस्य पारनेर-नगर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार संदेश कार्ले यांना संभाजी ब्रिगेडने पाठिंबा जाहीर केला आहे. त्याबाबतचे पत्र संभाजी ब्रिगेड पार्टीचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी कार्ले यांना दिले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात सामना रंगला आहे. तर वंचित बहुजन आघाडी, मनसे व बंडखोरांनी अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उडी घेतल्याने निवडणुकीत रंगत वाढली आहे. पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून काशिनाथ दाते उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीकडून राणी लंके उमेदवार आहेत. तर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणुकीच्या मैदानात आहेत. नगर तालुक्यातील एकमेव उमेदवार असल्याने कार्ले सर्वाधिक मताधिक्य घेतील असा अंदाज बांधला जात आहे. तसेच शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याने शिवसैनिक कार्ले यांच्या पाठिशी उभे राहतील असा अंदाज बांधला जात आहे. नगर तालुक्यातील गावांप्रमाणेच पारनेरमध्येही कार्ले यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

संभाजी ब्रिगेडने काय म्हटलेय पत्रात...
आपण शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारधारा समाजामध्ये रुजविण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या विचारधारेला अभिप्रेत असलेले पुरोगामीत्वाच्या व विकासाच्या समविचारी विचारधारेसाठी कार्यरत आहात. ही विचारधारा कार्य सातत्यपूर्णरित्या समाजाला न्याय देण्यासाठी समाजातील विषमता दूर करुन मराठ्यांच्या ओबीसीमध्ये समावेश, ओबीसी आरक्षणाचे संरक्षण, जातनिहाय जनगणना, बेरोजगारी, महिला सक्षमीकरण, शैक्षणिक धोरण, जुनी पेन्शन, आरोग्य धोरण, शेतकरी, कष्टकरी, शिक्षक विद्यार्थी यांच्या अडचणी दूर करण्यासाठी भविष्यात प्रमाणिक प्रयत्न करुन विधानभवनात वेळोवेळी यासाठी आवाज उठवाल. या विश्वासासह संभाजी ब्रिगेडतर्फे आपणास जाहीर पाठिंबा देण्यात येत असल्याचे पत्रात म्हटले आहे. 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post