माय नगर वेब टीम
पाथर्डी: राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान लोकप्रतिनिधींना पाच वर्षात ना जनतेशी संवाद साधता आला ना विकासकामे करता आली. मी दहा वर्षे मंजूर केलेल्या विकासकामांचे श्रेय घेत नारळ वाढवत फोटो सेशन करण्याचे काम केले. त्यांनी आजही त्यांचा पाच वर्षांपूर्वी केलेला जाहिरनामा दाखवून त्यातील किती आश्वासने पूर्ण झाली हे उदाहरणासह दाखवून द्यावी. राहुरी शहराला स्मार्ट सिटी करणार, एमआयडीसी आणणार असा गवगवा करून त्यांनी मते मिळवली. पण अडीच वर्षे मंत्रीपदी असूनही त्यांना काहीच करता आले नाही. सहकारी संस्था मोडकळीस आणल्या, मी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भूमीपूजन केलेली पाणी योजना अडवून ती पूर्ण होऊ दिली नाही. ते मला समोर येऊन विकासकामांची चर्चा करण्याचे सांगतात. पण मी समोर येण्याची गरज नाही. त्यांना राहुरीतील जनताच निकालातून चोख प्रत्युत्तर देणार आहे. एमआयडीसी ऐवजी स्वतःच्या खाजगी साखर कारखाना चालवून ऊस उत्पादकांना तुटपुंजा दर देऊन त्यांना लुटण्याचे काम केले. मामा मोठा तालेवार असताना भाच्याला मंत्रीपद मिळूनही मतदारसंघात ठसा उमटवला आला नाही, असा घणाघात राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी नाव न घेता तनपुरे यांच्यावर केला.
पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी पुरुषोत्तम आठरे पृथ्वीराज आठरे, मिर्झा मण्यार, सुनील साखरे, आबासाहेब अकोलकर, सुभाष अकोलकर, राहुल अकोलकर, प्राध्यापक अमोल आगाशे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
आ.प्राजक्त तनपुरे यांनी विविध सभांमध्ये केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना माजी मंत्री कर्डिले म्हणाले की, सध्या विरोधी उमेदवार स्वतःचे अपयश झाकण्यासाठी बिनबुडाचे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. त्यांना संधी मिळाली, सरकारमध्ये मंत्रीही झाले. सहा खाती मिळाली. त्याचा मतदारसंघासाठी काय उपयोग झाला. नगरविकास खाते असताना राहुरी शहरात काहीच विकास झाला नाही. साधे बसस्थानकही यांना नवीन करता आले नाही. शहरात सर्वत्र बकाल अवस्था आहे. वाहतुकीची समस्या आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात तर ना मंत्री पोहोचले ना त्यांचे खाते पोहोचले. मंत्री म्हणून एका पत्रावर त्यांना गावांचा कायापालट करता आला असता. पण त्यांनी फक्त ठेकेदार पोसण्याचे काम केले. फक्त फोटो सेशन करायचे आणि कामाचा आव आणायचा एवढच त्यांनी केले. सडे, पाचगाव गावांची पाणी योजना मंजूर करून माझ्या कार्यकाळात कार्यारंभ आदेशही देण्यात आला. त्यातही खोडा घालून त्यांनी जनतेला पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम केले.
आज राहुरीतील युवा वर्गाला रोजगारासाठी बाहेर स्थलांतरित व्हावे लागते. त्यांच्यासाठी यांनी काय केले. वाड्यावर बसून विकासकामे होत नसतात प्रत्यक्ष जनतेत जाऊन दररोज लोकांची सुखदुःख वाटून घ्यावी लागतात. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना सामान्यांच्या व्यथा कशा कळणार. त्या माझ्यासारख्या सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्यांनाच कळणार. म्हणुनच मला जनतेने तीस वर्षे प्रेम दिले. विश्वास ठेवला. यांना जनता पाच वर्षात कंटाळली आहे निकटचे लोक साथ सोडून जात आहेत, याचे आत्मपरीक्षण त्यांनी केले पाहिजे अशी टीकाही कर्डीले यांनी केली आहे.
Post a Comment