माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाकडून माजी आमदार राहुल जगताप एकमेव दावेदार होते. तशी त्यांनी तयारी सुरू केली होती.प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले होते.पण जागा वाटप प्रक्रियेच्या अंतिम दिवसात चक्र असे काही फिरले की अनपेक्षितरीत्या ही जागा शिवसेना उबाठा गटाकडे जात अनुराधा नागवडे यांना उमेदवारी मिळाली आणि राहुल जगताप यांना वेगळी वाट धरावी लागली. या मतदार संघात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे तसेच तालुक्यातील जवळपास सर्वच महत्त्वाच्या संस्था राहुल जगताप यांच्या ताब्यात आहेत.असे असतानाही त्यांना उमेदवारी न मिळाल्याने तालुक्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
परिणामी श्रीगोंदा मतदार संघात राहुल जगताप यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत मोठी सहानुभूतीची लाट उसळली.राहुल जगताप यांनीही अपक्ष उमेदवारी करत जोरदार प्रचार सुरू केला. गावोगावी त्यांच्या प्रचार सभांना मिळणारा पाठिंबा आणि मतदार संघात बदलत चाललेली हवा पाहून मविआच्या अंतर्गत काहीतरी घडामोडी घडल्या आणि आज अचानक राहुल जगताप यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातून बडतर्फ करण्यात आले.पण हा सर्व फार्स असून जर राष्ट्रवादीला बडतर्फ करायचेच असते तर फार पूर्वीच ही प्रक्रिया केली गेली असती. पक्षाला पूर्ण जाणीव आहे की जर राहुल जगताप यांना या मतदार संघातून बडतर्फ करणे म्हणजे या मतदार संघातून पक्षाचे अस्तित्व संपवणे होणार आहे.त्यामुळे त्यांनी भरपूर वेळ घेतला. अखेरच्या टप्प्यात मविआ मित्र पक्षातील इतर पक्षांचा दबाव वाढल्याने बडतर्फीचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून समजते पण हा फार्स पण राहुल जगताप यांच्या पथ्यावर पडताना दिसत आहे.अन्याय सहन करूनही प्रचारात पक्षाविरोधात एकही अवाक्षर न काढणाऱ्या राहुल जगताप यांच्यावर बडतर्फ कारवाई आल्याने मतदार संघात पुन्हा सहानुभूती वाढली आहे.
मतदार संघातील मतदार राहुल जगताप हे शरद पवार यांचेच उमेदवार आहेत असे स्पष्ट बोलत आहेत. राहुल जगताप यांना राष्ट्रवादी पासून वेगळे करण्याचा हा डाव आहे.शरद पवार आणि राहुल जगताप यांचा सबंध नाही हे दाखविण्यासाठी बडतर्फ करण्यासाठी मोठा दबाव पक्षावर टाकण्यात आल्याचे समजते.पण बडतर्फ कारवाई राहुल जगताप यांच्या पथ्यावर पडताना दिसत आहे. कार्यकर्त्यांमध्ये विरोधी उमेदवारांबाबत रोष निर्माण झाला असून राहुल जगताप यांचे कार्यकर्ते आता दुप्पट त्वेषाने कामाला लागणार असल्याचे दिसत आहे.
Post a Comment