‘नायतर आम्हाला कुत्रं विचारणार नाही’, भरसभेतच अजित पवार भडकले

 


माय नगर वेब टीम 

पुणे : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांचा सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभेसाठी पाठिंबा मिळावा, यासाठी प्रयत्नशील असलेले अजित पवार आता विधानसभा निवडणुकीत संग्राम थोपटेंच्या विरोधात चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. आज त्यांनी भोर येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. या सभेत विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांच्यावर जोरदार टीका केली. गेल्या कित्येक वर्षांपासून भोरचा विकास झालेला नाही, तरी तुम्ही त्याच त्याच व्यक्तीला का निवडून देता? असा सवाल त्यांनी मतदारांना विचारला. तसंच भाषण सुरू असतानाच त्यांनी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना खडे बोल सुनावले.

अजित पवार का संतापले?

भोर येथे भाषण करत असताना अजित पवारांची नजर बाजूला उभ्या असलेल्या लोकांवर गेली. स्टेजसमोर मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या लोकांना बसायची परवानगी द्या, असे सांगून अजित पवार पोलिसांवर डाफरले. ते म्हणाले, “ये, पोलिसांनो त्या लोकांना सोडा. ती माझी लोकं उभी आहेत. त्यांना कोण अडवतं, ते बघतो. सोडा त्यांना. मला झेड दर्जाची सुरक्षा आहे, मी सांगतोय त्यांना इथं बसवा. लोकं उभी राहत आहेत. हा कुठला न्याय. आमच्यामागं लोक असतील तर आम्हाला महत्त्व. नाहीतर कोण कुत्रही विचारणार नाही आम्हाला.”

शरद पवार यांचे कट्टर विरोधक अशी ओळख असलेले माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव, काँग्रेसचे भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम थोपटे यांचा लोकसभेला पाठिंबा मिळावा यासाठी सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अनंतराव थोपटेंची भेट घेतली होती. मात्र शेवटी शरद पवार यांनी स्वतःहून थोपटेंची भेट घेऊन समेट घडवून आणला होता. त्यामुळे भोर-वेल्हे-मुळशी येथून सुप्रिया सुळे यांना पाठिंबा मिळाला.

भोरमध्ये आलो की लाज वाटते

याच सभेत बोलत असताना अजित पवार म्हणाले की, भोर तालुक्यात आल्यावर मला लाज वाटते. काय इथलं बसस्थानक? एकदा माझ्या बारामतीमध्ये येऊन आमचं बसस्थानक बघा. विकास बघा. मी याआधीही राजगड सहकारी साखर कारखाना माझ्या लोकांच्या हाती द्या, असे सांगितले. पण तुम्ही ऐकलं नाही. आज इतर कारखाने पुढं गेले. पण राजगडची अवस्था वाईट आहे. भोरवासियांना मी साष्टांग दंडवत घालतो. इतकी असुविधा असूनही तुम्ही एकाच माणसाला निवडून देता. तुमची कधी सटकणार? असा सवाल अजित पवार यांनी विचारला.


भोर विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शंकर मांडेकर उभे आहेत. दोन्ही उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत होईल, असे वाटत असले तरी महायुतीत बंडखोरी करत रिंगणात उतरलेले शिवसेना (शिंदे) गटाचे कुलदीप कोंडे, भाजपाचे किरण दगडे यामुळे भोर विधानसभा मतदार संघात चुरशीची लढत होणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post