डॉ. किरण लहामटेंनी अकोलेचा गड राखला, अमित भांगरेंचा पराभव
माय नगर वेब टीम
अकोले - अकोले विधानसभा मतदार संघात झालेल्या चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉ. किरण लहामटे हे विजयी झाले आहेत. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अमित भांगरे यांचा पराभव केला आहे. बहुरंगी लढतीत आ.डॉ. किरण लहामटे यांनी सलग दुसर्यांदा विजयश्री खेचून आणला.
महाविकास आघाडीचे अमित भांगरे-68402, महायुतीचे डॉ.किरण लहामटे-73958, अपक्ष वैभव पिचड-32783, मारुती मेंगाळ-10830, मधुकर तळपाडे-1747, पांडुरंग पथवे-2797, भिवा घाणे-446, किसन पथवे-387, विलास घोडे यांना 1457 मते मिळाली आहेत. 2606 मतदारांनी नोटाला मतदान केले आहे. सहाव्या फेरी पासून अमित भांगरे यांचे मताधिक्य कमी झाले, मध्यंतरी ते कमी जास्त झाले. त्यानंतर लहामटे यांचे मताधिक्य वाढत गेले. ते शेवटच्या 22 व्या फेरी पर्यंत कायम राहिले.
अमित भांगरे यांच्या प्रतीनिधी कडून व्हि व्ही पॅटच्या मत मोजणीसाठी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार लहीत बुद्रुक, तांभोळ, बहिरवाडी, ब्राम्हणवाडा, कौठे बुद्रुक या पाच मतदान केंद्रांवरील स्लीप यांची मोजणी करण्यात आली. पण निकालात कोणताही फरक झाला नाही. त्यामुळे अंतिमतः डॉ. किरण लहामटे हे 5556 मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव यांनी घोषित केले. विजयानंतर डॉ. लहामटे समर्थकांनी फटाक्याची आतषबाजी करत फटाके फोडत विजयोत्सव साजरा केला.
Post a Comment