शिर्डीत विखे पाटीलच किंग; गड राखण्यात यश

 


माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर : शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सलग सात वेळा शिर्डी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. यावेळीही भाजपकडून पुन्हा राधाकृष्ण विखे पाटील यांना रिंगणात उतरवण्यात आले असताना त्यांच्यासमोर काँग्रेस उमेदवार प्रभावती घोगरे आणि भाजपचे बंडखोर उमेदवार राजेंद्र पिपाडा यांचे आव्हान होते. या अटीतटीच्या लढतीत राधाकृष्ण विखे पाटलांनी विक्रमी आघाडी घेत मोठा विजय मिळवला आहे.


शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहता 1995 पासून विखे पाटील घराण्याचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. विखे पाटील घराणे हे विठ्ठलराव विखे पाटलांपासून सहकार क्षेत्रात सक्रीय असलेले घराणे आहे. त्यामुळे या घराण्याचे नगर जिल्ह्यात मोठे प्रस्थ आहे. याच्या जोरावरच राधाकृष्ण विखे पाटील 1995 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर पहिल्यांदा निवडून आले. तेव्हापासून ते आतापर्यंत पण 2019 च्या निवडणूक काळात विखे पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपचे कमळ हाती घेतले आणि निवडूनही आले. विखे पाटील 2024 मध्ये भाजपकडून दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अखेर राधाकृष्ण विखे पाटील यांनी बंडखोरीचे आव्हान संपुष्टात आणले आहे. तर काँग्रेसच्या प्रभावती घोगरेंना देखील पराभव चारला आहे.


शिर्डी विधानसभा मतदारसंघात एकूण 74.52 टक्के मतदान झाले आहे. राधाकृष्ण विखे पाटलांना तब्बल 50 हजार 517 मतांनी विक्रमी आघाडी मिळाली आहे. राधाकृष्ण विखे पाटलांच्या पारड्यात यंदा 1 लाख 20 हजार 482 मते पडली आहेत. तर काँग्रेसच्या प्रभावती घोगरेंना 60 हजार 965 मते मिळाली आहेत. तर भाजपचे बंडखोर उमेदवार राजेंद्र पिपाडा यांना केवळ 1 हजार 390 मते मिळाली आहेत. विखे पाटील यांनी हा ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post