माय नगर वेब टीम
नाशिक : राज्यात विधानसभा निवडणूका असल्याने सध्या प्रचाराला वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करताना दिसत आहेत. मोठ्या नेत्यांकडून या निवडणुकीदरम्यान अनेक मोठे गौप्यस्फोट केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बाबतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ ?
लोकसभेला नाशिक मतदारसंघात लढण्यासाठी छगन भुजबळ इच्छुक होते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आग्रह कायम ठेवल्यानं ही जागा शिवसेनेकडे गेली. याबद्दल आता छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलंय. ते म्हणाले की, मला नाशिकमधून निवडणूक लढवायला भाजप नेत्यांनी सांगितलं होतं, त्यामुळे मी तयारीसुद्धा केली होती.
लोकसभा निवडणुकीवेळी दोन तीन याद्या जारी झाल्या. तरी माझं नाव आलं नाही. जेव्हा मी चौकशी केली तेव्हा या जागेसाठी एकनाथ शिंदे आग्रही होते. त्यांचं म्हणणं होतं की, जर शिवसेनेला ही जागा मिळाली तर आजूबाजूच्या चार पाच जागाही ते जिंकतील पण निकाल याच्या उलट लागला. माझं तिकिट एकनाथ शिंदे यांनीच कापलं असा खुलासा छगन भुजबळ यांनी केला आहे.
शरद पवारांच्या निवृत्तीवर केलं भाष्य
शरद पवार यांनी एका प्रचारसभेवेळी निवृत्तीचे संकेत दिले होते. याबद्दल छगन भुजबळ यांना विचारलं असता त्यांनी म्हटलं की, शरद पवार यांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. मला माहितीय की ते घरी बसणाऱ्या लोकांपैकी नाहीत. ते एकही दिवस शांत बसणार नाहीत. याआधीही ते अनेकदा असं बोलले आहेत पण राजकारणातून निवृत्ती घेतली नाही.
Post a Comment