मुख्यमंत्रीपदाचा निर्णय झाला!; स्थळ अन् वेळही ठरली! शपथविधी कधी, कुठे…

 


माय नगर वेब टीम 

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच यावर आता शिक्कामोर्तब होताना दिसत आहे. दिल्लीत गुरुवारी रात्री पार पडलेल्या बैठकीनंतर तसे स्पष्ट संकेत मिळत आहे. आता एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असून त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री होण्याची संधी मावळल्याचे दिसते. परंतु समोर येत असलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदेंनी मात्र शिवसेनेच्या उपमुख्यमंत्रीपदासाठी भाजप पक्षश्रेष्ठींसमोर एक अट घातली असल्याचे समजत आहे. एकनाथ शिंदे हे गृहमंत्रीपदावर अडून बसले आहेत. गृहमंत्रिपद मिळालं तरच आपण उपमुख्यमंत्रिपद स्विकारणार, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. अतिशय महत्वाच्या गृहखात्यासह आणखी १३ खात्यांची शिंदेंनी अमित शहांसमोर मागणी केली असल्याचे समजते.


दरम्यान महायुती सरकारचा शपथविधीचा कार्यक्रम ठरला आहे. ५ डिसेंबरला आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वी महायुतीच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे. पण एकनाथ शिंदे अचानकपणे दरे गावी पोहोचले आहेत. शिंदे दोन दिवस तेथे मुक्कामी राहणार असून दोन दिवस महायुतीच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. तरीही मंत्रि‍पदाच्या वाटाघाटीमुळे राजकीय वातावरण मात्र गरम असणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे राज्यकारभारातील सर्वात महत्वाच्या खातं असलेल्या गृहखात्यावर अडून बसले आहेत. तर नगरविकास खात्यासह अन्य १२ खात्यांवर त्यांनी आपला दावा मजबूत केला आहे. पण मागच्या सरकारमध्ये भाजपकडे गृहखातं राहिलं असल्याने त्यांचा देखील यावर प्रबळ दावा आहे.


महायुतीची पुढील बैठक मुंबईत होणार असल्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले आहे. दरम्यान अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली, असेही एकनाथ शिंदेंनी नमूद केले होते. आता राज्याचा कारभारी कोण आणि सोबतच राज्य मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.


मंत्रिपदासाठी रस्सीखेच

दिल्लीत मुख्यमंत्रीपदावरून खलबते सुरू असताना मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटप हा चर्चेत कळीचा मुद्दा ठरणार आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडला असला तरी ५७ आमदार निवडून आल्यामुळे त्यांना अधिकची व चांगली मंत्रीपदे हवी आहेत. नगरविकास खाते शिंदे यांच्याकडे कायम राहील, अशी चिन्हे आहेत. याखेरीज शिंदे गटाने ऊर्जा, जलसंपदा, उद्याोग या महत्त्वाच्या खात्यांवर दावा केला आहे. मागच्या मंत्रिमंडळात शिंदेंच्या पक्षाकडे उद्याोग, रस्ते विकास, सामाजिक न्याय ही खाती होती. अजित पवार यांच्याकडे वित्त खाते कायम राहणार का, याची उत्सुकता आहे. कारण भाजप गृह आणि वित्त या खात्यांसाठी आग्रही राहण्याची शक्यता आहे. यासह सहकार, कृषी, महिला व बालकल्याण, अन्न व नागरी पुरवठा अशी खाती मिळावीत, असा राष्ट्रवादीचा प्रयत्न असेल. गेल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या आणि चांगली खाती कायम राहावीत, असा अजित पवार यांचा आग्रह असल्याचे समजते. मात्र भाजप मित्र पक्षांना फारसे झुकते माप देण्याची शक्यता नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. याउलट जनमानसात प्रभाव पडेल अशी सारी खाती ही आपल्याकडे राहावीत, असा भाजपचा प्रयत्न असेल.

पालकमंत्री जिल्ह्यातीलच असावा

तसंच, मागच्या मंत्रिमंडळात अनेक पालकमंत्री पदे जिल्ह्याच्या बाहेरील आमदाराकडे देण्यात आली होती. ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद शंभूराज देसाई यांच्याकडे होतं. ते पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. दरम्यान, यावेळी जिल्ह्यातील पालकमंत्री मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. यामध्ये ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे संजय केळकर यांनी पालकमंत्री पद मिळावी, अशी मागणी केली आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पालकमंत्री पदासाठी संजय केळकर इच्छूक

संजय केळकर म्हणाले, “जिल्ह्यातील पालकमंत्री असावा हे स्वाभाविक आहे. फक्त ठाण्यातच नव्हे तर प्रत्येक जिल्ह्यात तिथला स्थानिक पालकमंत्री असावा असं संपूर्ण महाराष्ट्राला वाटतं. कारण, तो कायम नागरिकांना उपलब्ध असतो. यामध्ये काहीही चूक नाही. त्यामुळे ही मागणी स्वाभाविक आहे.”

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post