माय नगर वेब टीम
दूध उत्पादकांना अनुदान देण्यासाठी राज्यसरकारकडून २६७ कोटी रूपये प्राप्त झाले असून अनुदान वाटपाची प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. जसजसे प्रस्ताव प्राप्त होतील त्यानुसार ऑक्टोबरअखेरपर्यंतचे अनुदान वितरीत केले जाणार आहे. तसेच नोव्हेंबर महिन्याचे प्रस्तावही अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी महत्वपूर्ण माहिती राज्याचे दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त प्रशांत मोहोड यांनी दिली. यामुळे दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दुधाचे दर प्रतिलिटर ३० रूपयांवर आल्याने राज्य सरकारने जुलैपासून प्रतिलिटर पाच रूपये अनुदान दूध उत्पादकांना देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता. मात्र त्यानंतर पुन्हा २८ रूपयांवर दर घसरल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ ऑक्टोबरपासून प्रतिलिटर सात रूपयांचे अनुदान देण्याचा नवा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.
त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिलिटर ३५ रूपये दराची बेरीज कायम राहून दिलासा मिळणार होता. मात्र तब्बल तीन-साडेतीन महिन्यांचे अनुदान रखडल्याने दूध उत्पादकांवर आर्थिक संकट कोसळले होते. याबाबत दैनिक सकाळने वेळोवेळी पाठपुरावा केला. अखेर आचारसंहितेनंतर अनुदान वितरणाची प्रक्रिया दुग्ध विकास विभागाने सुरू केली आहे.
दहा-दहा दिवसांच्या तीन मस्टरमध्ये शेतकऱ्यांना महिन्याचे अनुदान दिले जाते. काही शेतकऱ्यांचे ऑगस्टमधील एक ते दोन मस्टरचे अनुदान बाकी होते. याशिवाय सप्टेंबर व ऑक्टोबरच्या माहित्याही दूधसंस्थांनी अपलोड केल्या आहेत. तेही अनुदान प्रलंबित होते. जसजसे प्रस्ताव प्राप्त होतील तसतसे ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबरचेही अनुदान वितरण करण्यास दुग्ध विकास विभागाने सुरवात केली आहे.
९१ कोटी रूपयांचे वाटपाचा टप्पा सुरू असून २६७ कोटी संपेपर्यंत वाटप सुरू राहणार आहे. दरम्यान, नोव्हेंबर महिन्याचे प्रस्ताव ऑनलाईन स्वीकारले जात नव्हते. त्या माहित्या अपलोड करणे अद्याप प्रलंबितच आहे. ते प्रस्तावही अपलोड कऱण्याच्या सूचना दुग्ध विकास आयुक्तांनी दिल्या आहेत.
मोहोड म्हणाले, ऑक्टोबरअखेरपर्यंतचे अनुदान आता वितरित करत आहोत. त्यासाठी संस्थांनी तातडीने फाईली द्याव्यात. ज्यांच्या फाईल प्रथम येतील त्यांना वाटप प्रत्यक्षात सुरू केले आहे. तसेच नोव्हेंबरच्या माहित्याही भरून घेत आहोत.
Post a Comment