१ लाख युवकांना राजकारणात आणण्याचा भाजपचा संकल्प
माय नगर वेब टीम : महाराष्ट्रात सत्याचा विजय झाला असून महाराष्टात विभाजनवादी शक्तीचा पराजय झाला आहे, असा घाणाघात पंतप्रधान मोदी यांनी जनतेशी संवाद साधताना महाविकास आघाडीवर केला. तसेच राजकरणाशी संबंध नसलेल्या १ लाख युवकांना मला राजकारणात आणण्याचा माझा संकल्प आहे, असेही ते यावेळी म्हणाले. ते आज (दि.२३) दिल्ली येथील भाजप मुख्यालयात बोलत होते. नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी सुरूवातीला 'जय भवानी, जय शिवाजी' अशी घोषणा देत आपल्या भाषणाला सुरूवात केली.
पुढे बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला महाविकास आघाडीपेक्षा सर्वाधिक मते मिळाली असून हा ऐतिहासिक महाविजयाचा हा जल्लोष आहे. या विजयाने जुने रेकॉर्ड तोडले आहेत. भाजपाच्या आघाडी असलेल्या महायुतीला सलग तिसऱ्यांदा जनादेश मिळाला आहे. काँग्रेस व इतर पक्षांना महाराष्ट्राने धडा शिकवला आहे, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे अभिनंदन केले. त्यानंतर राजकरणाशी संबंध नसलेल्या १ लाख युवकांना राजकारणात आणण्याचा माझा संकल्प आहे, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र हा देशासाठी महत्वाचे ‘ग्रोथ इंजिन’ आहे. काँग्रेसला जे जमले नाही ते आम्ही करुन दाखवले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला. आज विश्व आमच्या संस्कृतीचा सन्मान करते कारण आम्ही आमच्या संस्कृतीचा सन्मान ठेवतो. आता महाराष्ट्रात पुढील पाच वर्षे ‘विकास भी विरासत भी’ या मंत्राने पुढे जात राहू. इंडिया आघाडीवाले सत्याचा स्वीकार करत नाहीत, ते सामान्य मतदारांना कमी लेखतात. पण या निवडणुकीत यांची खोटी आश्वासन चालली नाहीत, असे म्हणत त्यांनी 'एक है तो सेफ है' चा पुन्हा नारा दिला. हा देशाचा महामंत्र असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
काँग्रेसने सावरकरांचा नेहमीच अपमान केला आहे. सत्तेच्या हव्यासापोटी काँग्रेसकडून जातीजातीत विष पेरण्याचा प्रयत्न केला जात असून गांधी कुटुंब सत्तेशिवाय राहू शकत नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. गांधी कुटुंबियांच्या हट्टामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना काम करता येत नाही, असे सांगत काँग्रेसचा अर्बन नक्षलवाद देशापुढील नवं आव्हान असल्याचा हल्लाबोलही त्यांनी यावेळी काँग्रेसवर केला.
Post a Comment