माय नगर वेब टीम
Manoj Jarange Patil on Election Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीची सरशी झाली. विधानसभा निवडणुकीत तमाम राजकीय विश्लेषक आणि बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजापेक्षाही उत्तम कामगिरी करत महायुतीने जोरदार मुसंडी मारली. शनिवारी झालेल्या मतमोजणीत महायुतीने २८८ पैकी २३५ जागा जिंकून महाविकास आघाडीचा दणदणीत पराभव केला. मराठवाड्यातही महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. लोकसभेला मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे महायुतीला फटका बसला होता. मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघापैकी सात ठिकाणी महायुतीचा पराभव झाला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांचा प्रभाव पाहायला मिळाला नाही. यावर आता खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे फॅक्टर अपयशी ठरलेल्या लोकांवर त्यांनी टीका केली आहे.
काय म्हणाले जरांगे पाटील?
“आम्ही विधानसभेत कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिला नव्हता. आम्ही मैदानातच नव्हतो. मी मराठा समाजाला बंधनमुक्त केले होते. त्यांना ज्यांना मतदान करायचे असेल ते करावे, असे मी जाहीर केले होते. त्याप्रमाणे मराठा मतदारांना जे काही करायचे होते, ते केले. त्यामुळे महायुती सरकार निवडून येण्यात मराठा समाजाचाही वाटा आहे. मराठा समाज सर्व पक्षात विखुरलेला आहे. त्यामुळे त्यांनी तिथे तिथे त्यांनी पूर्ण ताकदीने काम केले”, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
जरांगे फॅक्टरबद्दल मोठे विधान
“जरांगे फॅक्टर अपयशी ठरल्याबद्दलही मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केले आहे. मराठवाड्यात जरांगे फॅक्टर असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी फेटाळून लावला. आमचा कोणताही फॅक्टर नव्हता. असा काही फॅक्टर असता तर महायुतीला इतके यश मिळाले नसते”, असे मनोज जरांगे म्हणाले. मराठा फॅक्टर आणि जरांगे फॅक्टर समजून घेण्यासाठी उभी हयात जाईल, असेही जरांगे म्हणाले. मराठा समाजाचे २०४ आमदार निवडून आले आहेत, असा दावाही त्यांनी केला.
अन्यथा मराठा छाताडावार बसले
जरांगे यांच्यावर टीका करणाऱ्यांचाही त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, गोड बोलून मराठ्यांची मते घेतली. आता सत्ता आली आहे तर नीट कारभार करा. मराठा समाजाला कोणचेही सोयरसुतक नाही. सरकार कुणाचेही यावे, आम्हाला त्याच्याशी देणेघेणे नाही. तुम्हाला आता आरक्षण द्यावे लागेल. कारण मराठ्यांशी कोणीच भिडू शकत नाही. मी आणि मराठा समाज विधानसभेच्या निवडणुकीत मैदानातच नव्हतो. त्यामुळे आम्हाला यामध्ये घेण्याची गरज नाही. आम्हाला आव्हान देणाऱ्यांना आम्ही किंमत देत नाही. सरकारने बेईमानी करू नये. सरकारचा शपथविधी झाल्यानंतर आम्ही समाजाची बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरविणार आहोत. जर आम्हाला दगा दिला तर मराठे छाताडावर बसतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मराठवाड्यात काय परिस्थिती?
मराठवाड्यात ४६ जागंपैकी एकूण २९ ठिकाणी मराठा उमेदवार जिंकून आले आहेत. त्यापैकी महायुतीचे सर्वाधिक २५ आमदार निवडून आले आहेत. तर इतर ठिकाणी मविआचे उमेदवार निवडून आले आहेत.
Post a Comment