माय नगर वेब टीम
नेवासा - शेतजमिनीच्या व्यवहारातून नेवासा तालुक्यातील चांदा येथील शेतकऱ्याचे अपहरण करण्यात आले. त्या शेतकऱ्याला गावठी कट्टा लावून धमकी देत २० लाखांची खंडणी मागण्यात आली आहे. घोडेगाव चौकात गुरुवारी (दि.२८) सकाळी ११ च्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी सोनई पोलिसांनी नगरमधील चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत विजय विठ्ठल चौधरी (वय ४८, रा. चांदा, ता. नेवासा) यांनी फिर्याद दिली आहे. चौधरी यांनी कलावती भगवान जावळे यांच्याकडून जमीन खरेदी केली होती. गुरुवारी फिर्यादी चौधरी त्यांच्या एमएच १७ बीएक्स ८१२४ क्रमांकाच्या वाहनात बसलेले असताना जमिनीच्या बाकी असलेल्या पैशाच्या कारणावरून कलावती जावळे यांच्या सांगण्यावरून अक्षय ऊर्फ विजय रमेश साळवे, (वय २०, रा. माधवबाग, भिंगार), राहुल श्रीरंग आढागळे (वय २८, रा. सिव्हिल हॉस्पिटल समोर सिद्धार्थनगर, नगर), आकाश संजय पवार, (रा. ब्रम्हतळे, भिंगार) हे निळ्या रंगाच्या मारुती स्विफ्ट कार मध्ये आले.
त्यांनी चौधरी यांना त्यांच्याच कारमध्ये मागील बाजूस बळजबरीने बसवून अपहरण करून घेऊन गेले. त्यांना मारहाण व शिविगाळ करत गावठी पिस्तुलातून गोळ्या घालून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. कलावती भगवान जावळे यांना देण्यासाठी १५ लाख रुपये व आरोपींच्या तावडीतून सुटण्यासाठी पाच लाख रुपये असे एकूण २० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे चौधरी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
वा प्रकरणीवरील साळवे, आढागळे, पवार या तीन जणांसह कलावती जावळे (हल्ली रा. वांबोरी ता. राहुरी) यांच्यावरही भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १४० (३), ३०८ (३)(५), ११५ (२), ३५२, ३५१ (२)(३), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अक्षय साळवे, राहुल आढागळे या दोन आरोपींना रात्री उशिरा सोनई पोलिसांनी नगर शहरातून ताब्यात घेत अटक केली आहे. अधिक तपास सोनईचे पोलिस उपनिरीक्षक डी. एम. गावडे करत आहेत.
Post a Comment