काशिनाथ दाते यांच्या प्रचाराचा नारळ फुटला, केले भावनिक आवाहन; म्हणाले, माझ्या आयुष्यात...



दैठणे गुंजाळ येथील खंडोबा मंदिरात फुटला प्रचाराचा नारळ 

माय नगर वेब टीम 

पारनेर - आजपर्यंत मी स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारातील छोटया मोठया १९-२०  निवडणूका लढविल्या. काही निवडणूकांमध्ये विजय झाला, काहींमध्ये पराभवही झाला. मात्र मी थकलो नाही, थांबलो नाही. लोकांसाठी काम सुरूच ठेवले. माझ्या आयुष्याचा शेवट या निवडणूकीने होणार असल्याचे सांगत या निवडणूकीत आपल्या पाठीशी उभे राहण्याचे भावनीक आवाहन महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते यांनी केले. 

 दाते यांच्या प्रचाराचा शुभारंभ दैठणे गुंजाळ येथील खंडोबा मंदिरात जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला. त्यानंतर झालेल्या सभेमध्ये दाते यांनी आपल्या भावना मांडल्या. 

     दाते म्हणाले, गेली ४० वर्षे काम केल्याने लोकांमध्ये माझ्याविषयी सहानुभुती आहे. मी माझ्या आयुष्यात माझ्यासाठी कमी व दुसऱ्यांसाठी जास्त काम केलेले आहे. स्व.वसंतराव झावरे,  विजयराव औटी यांच्या निवडणूकीचे मी स्वतः नियोजन केले. आज मात्र मी उमेदवार असल्याने नियोजनाची जबाबदारी माझ्या सहकाऱ्यांनी स्विकारावी असे आवाहन त्यांनी केले. 

       दाते पुढे म्हणाले, भाजपाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारासाठी आघाडीवर असून त्याचा मला अभिमान आहे. ही निवडणूक माझ्या आयुष्यातील शेवटची निवडणूक आहे. ४० वर्षे राजकारण करताना स्व यशवंतराव चव्हाण यांचा विचार घेउन मी काम केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा मी कार्यकर्ता असल्याचे दाते यांनी सांगितले. 

       यावेळी राष्ट्रवादी युवतीच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे, सुजित झावरे, अशोक सावंत, विश्वनाथ कोरडे, प्रशांत गायकवाड, वसंत चेडे, अश्विनी थोरात, सुषमा रावडे, सुनील थोरात, शाम पिंपळे, दादाभाऊ चितळकर,  दवेंद्र गावडे, अरूण  होळकर, दिलीप भालसिंग, भाऊ भोर, सुभाष दुधाडे, बाबासाहेब खिलारी, राहुल शिंदे, बाळासाहेब लामखडे, विक्रमसिंह कळमकर, गणेश शेळके, डॉ. भाऊसाहेब खिलारी, अशोक चेडे, रामचंद्र मांडगे, शिवाजी खिलारी, किसन धुमाळ, लहू भालेकर, एकनाथ धुरपते, एकनाथ सोनवणे, बापूसाहेब गुंजाळ, ॲड. युवराज पाटील, दिनेश बाबर, संतोष गायकवाड, छबू कांडेकर, दत्ता पवार, दादाभाऊ वारे आदी उपास्थित होते.

 

म्हणून सुजित झावरे तातडीने नगरकडे  

ज्यांनी प्रचाराच्या शुभारंभाचा नारळ फोडला ते सुजित झावरे हे सभेतून निघून गेले. त्यांच्या आई सुप्रियाताई तथा माई यांना हृदयाचा त्रास झाल्याने त्यांना रूग्णालयात घेऊन जाण्यासाठी ते तातडीने नगरकडे रवाना झाले असून त्याचा वेगळा अर्थ लावण्यात येऊ नये. 

काशिनाथ दाते- महायुतीचे  उमेदवार


विकासाच्या मुद्यावर निवडणूक

पाच वर्षापूव खोटी नाटी अश्वासने देण्यात आली. त्यावर मी बोलणार नाही. मला विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक न्यायची आहे. वसंतराव झावरे, विजय औटी यांच्या काळात विकास झाला. पाच वर्षात काय झाले ? एमआयडीसीचा उपयोग सर्वसामान्यांसाठी झाला पाहिजे, भुमिपुत्राला रोजगार मिळाला पाहिजे यासाठी माझी ही निवडणूक असल्याचे दाते म्हणाले. 


 रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी बांधील

तालुक्यातील रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी मी बांधील असून तसा जाहिरनामा आम्ही प्रसिध्द केला आहे. जिथे काम केले तिथे प्रामाणिक काम केले. बाजार समितीला राज्यात नावलौकीक आहे ते काम माझ्याच नेतृत्वाखाली झाले. जिल्हा परिषदेमध्ये सभापती म्हणून काम करताना मी केवळ जिल्हा परिषदेच्या टाकळी गटात नाही तर संपूर्ण तालुक्यात काम केले. काम करताना पक्ष, गट तट पाहिले नाहीत गावागावात विकास कामे केली असल्याचे दाते यांनी सांगितले.


दाते सर म्हणून माझी ओळख

काशिनाथ दाते  व्यक्ती नगर तालुक्यात माहीती नसली दाते सर म्हणून नगर तालुक्यात माझी ओळख आहे. मी प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होत आलो आहे. मात्र माझी एकच चुक झाली की मी सोबत कॅमेरा घेऊन गेलो नसल्याची मिश्किलीही दाते यांनी केली. 


कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही 

गावागावात चाललेली भांडणे, ग्रामपंचायत, सोसायटयांमधील वाद थांबवायचे असतील तर तुम्ही मला सहकार्य करा. हे सगळे आपण थांबवू.  ज्यावेळी माझ्यावर अन्याय झाला त्याला मी प्रतिकार केला आहे. इकडचा तिकडे गेलो नाही. मला संधी दिली तर या तालुक्यात नाहीशी झालेली शांतता पुन्हा प्रस्थापित करू. सुरु असलेला गोंधळ थांबवू. कोणत्याही कार्यकर्ता वाऱ्यावर सोडला जाणार नाही सर्वांना बरोबर घेऊन काम केले जाईल अशी ग्वाही दाते यांनी यावेळी दिली.

 

अजितदादांचे आश्वासन पुर्ण करू  

 अजित पवार यांच्या उपस्थितीत कान्हूरपठार येथे पाणी परिषद झाली होती. पवार यांनी पारनेर तालुक्याचे हक्काचे पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. ही योजना मोटारीचे बील कोण भरणार या मुद्यावर रखडली. आता प्रगत तंत्रज्ञान आले आहे. सोलरवर १०० अश्वशक्तीचे पंप चालतात. त्याचा वापर करून पठार भागावर पाणी आणण्यात येउन अजित पवार यांनी दिलेले आश्वासन पुर्ण केले जाईल असे आश्वासन दाते यांनी यावेळी दिले. 


१६ गाव योजनेसाठी मुळातून पाणी 

१६ गाव पाणी योजना अनेक वर्षे टंचाईमध्ये ही योजना सुरू होते. मांडओहळचा पाणी साठा संपल्यानंतर ही योजना बंद होते. मुळा डॅममधून या योजनेसाठी पाणी आणण्याच्या योजनेला चालना देण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे दाते म्हणाले. 

घाटमाथ्यावरील पाण्याची योजना माग लावू 

बाळासाहेब विखे यांच्या संकल्पनेतील सहयाद्रीच्या घाटमाथ्यावर पडणारे पश्चिमेकडे वाहून जाणारे पावसाचे पाणी पूर्वेकडे सोडण्याची योजना आहे. ही योजना केंद्राकडे पोहचविण्यात आली असून आम्हाला ताकद दिली तर ही योजनाही मार्गी लावू.

काशिनाथ दाते - महायुतीचे उमेदवार

 

घराघरांत प्रचार पोहचवा 

अफवांवर विश्वास ठेऊ नका. कामाला लागा. प्रचाराची साधने पुरविली जातील. घराघरापर्यंत प्रचार पोहचला पाहिजे. लोकसभा निवडणूकीत आम्ही घराघरापर्यंत पोहचण्यात कमी पडलो ही चुक सुधारायची असल्याचे दाते म्हणाले. 


दाते नव्हे, अजितदादा उमेदवार 

 व्यासपीठावरील दिग्गज पाहीले तर दाते यांचा विजय निश्चित आहे. विरोधक अपप्रचार करतील. कार्यकर्त्यांनी सतर्क राहीले पाहिजे. दाते सर हे उमेदवार नसून स्वतः अजितदादा उमेदवार आहेत. अजित पवार यांचा शब्द ठाम असतो हे महाराष्ट्राला माहीती आहे. संन्याशाचे सोंग घेऊन कोणी वागणार असेल तर पारनेरकर त्यांना माफ करणार नाहीत.

संध्या सोनवणे - प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी युवती काँग्रेस


अजितदादा त्यांचे पुनर्वसन करणार 

तालुक्यात गैरसमजाची राळ उडविली जात आहे. निवडणूकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पारनेरची जागा राष्ट्रवादीकडे राहिली. पुढे वसंतराव झावरे यांच्या खांद्याला खांदा लाऊन काम करणारे काशिनाथ दाते यांनी पक्षासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सुजित झावरे, माधवराव लामखडे, विजय औटी हे देखील पक्षासोबत आले. सर्वेक्षणात ज्याला पसंती मिळेल त्यास उमेदवारी देण्याची ग्वाही अजित पवार यांनी दिला होती. त्यानुसार दाते यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. उर्वरीत इच्छुकांचे पुनर्वसन करण्याची ग्वाही दादांनी दिली आहे. दादांसमोर कोणालाही बळजबरीने नेण्यात आलेले नाही. 

अशोक सावंत - जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस 


स्व वसंतराव झावरे यांचा आदर्श घेउन दाते यांची वाटचाल सुरू असून त्यांचे काम पाहून त्यांना अजित पवार यांनी संधी दिली आहे. पारनेर-नगरच्या परिवर्तनाची ही निवडणूक असून चांगल्या नेतत्वाला संधी म्हणून काशिनाथ दाते यांना संधी द्या.

विक्रमसिंह कळमकर

तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

संधीचे सोने करा 

समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊ शकत जाणारे व्यक्तिमत्व अशी काशिनाथ दाते यांची ओळख आहे. आमदार म्हणून काम करण्याची संधी आपण त्यांना दिली पाहिजे. या संधीचे सोने केले पाहिजे. महायुतीने समाजातील सर्व घटकांना न्याय दिला असून राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा आणण्यासाठी काशिनाथ दाते यांनी मतदान करावे. 

संदीप ठुबे - शिवसेना पदाधिकारी 


तर लाडकी बहिण योजना बंद होईल ! 

प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या गावामध्ये महायुती सरकारच्या योजना समजावून सांगितल्या पाहिजेत. लाडकी बहिण योजना बंद होणार नाही. मात्र दाते सरांना मतदान केले नाही तर योजना बंद होईल. केंद्रात महायुतीचे सरकार असून राज्यातही त्याच विचारांचे सरकार येणार आहे. 

अरूण होळकर - मा. जि प सदस्य 

सुजित झावरे, डॉ. श्रीकांत पठारे यांनी मोठेपणा दाखविला

बुध्दीवाद्यांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या तालुक्यात गेल्या काही वर्षात वेगळे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. या निवडणूकीत सुसंस्कत, बुध्दीवादी उमेदवार लाभला असून सर्वांना बरोबर घेउन जाणारे हे नेतत्व आहे. सुजित झावरे, डॉ. श्रीकांत पठारे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून उमेदवारी मागे घेतली असून त्यांनी मनाचा मोठेपणा दाखविल्याबद्दल मी त्यांचे आभार माणतो. टाकळी ढोकेश्वर गटातून दाते यांना सर्वाधिक मतदान देणार आहोत. 

डॉ. भाऊसाहेब खिलारी 


दिड महिन्यांपासून भाजपा कार्यकर्ते सक्रीय 

उमेदवारी जाहिर होण्यास विलंब झाला. दाते यांच्या उमेदवारीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. त्यांना तालुक्याचे प्रश्न माहीती आहेत. राजकारण करताना समाजाकरण डोळयापुढे ठेऊन त्यांनी काम केले. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच भाजपाचे कार्यकर्ते दिड महिन्यांपासून प्रचारात उतरले आहेत. बुथ कमिटयांच्या बैठका घेण्यात येऊन महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. तालुक्याच्या विकासासाठी महायुतीचा उमेदवार विजयी करावा लागेल. विरोधी उमेदवारांना ३ लाख ४६ हजार मतदारांमध्ये एकही लायक उमेदवार सापडला नाही का ? एकाच घरात दोन पदे कशासाठी ?

राहुल शिंदे - तालुकाध्यक्ष, भाजपा

 

तुम्ही आरक्षण का दिले नाही ? 

पाच वर्षात मराठा व धनगर आरक्षणाचे मुद्ये गाजले. विरोधांकडून आरक्षण देण्याची मागणी करण्यात येते. मात्र गेली सत्तर वर्षात तुम्ही सत्तेत असताना आरक्षण का दिले नाही. आरक्षणाचा मुद्या पुढे करून निवडणूकीत मते वळविण्याचा प्रयत्न होत आहे. निवडणूकीत हा मुद्दा आणणे योग्य नाही. आरक्षण हा घटनेच्या चौकटीतील अवघड विषय आहे.

दादाभाउ चितळकर - मा. अध्यक्ष, जिल्हा दुध संघ


दाते यांना मोठया पदावर बसविण्यासाठी शिफारस करू 

महाराष्ट्राची निवडणूक देशासाठी महत्वाची आहे. या निवडणूकीकडे जगभरातील जनतेचे लक्ष असून महायुती कशी जिंकते याकडे लक्ष आहे.महायुती सरकार स्थापन केले तर केंद्रातील सरकारही मजबूत होईल. त्यानंतर देशाचा जगात डंका वाजेल. केंद्रात नरेंद्र मोदी आल्यानंतर जगात भारताची इज्जत वाढली आहे. पूव लोकांनी गरीबीवर तीन तीन निवडणूका जिंकल्या. मोदींनी मात्र विविध योजनांद्वारे २२ लाख करोड रूपये खर्च करून गरीबांसाठी काम केले. दाते यांना विजयी केले तर महाराष्ट्रात महायुती येईल. महिला, शेतकरी, युवक यांचे कल्याण होईल. भारताला विश्वगुरूच्या स्थानावर बसविण्यासाठी महायुतीला विजयी करा. प्रत्येक बुथवर काम केले तर आपण लंका दहन केल्याशिवाय राहणार नाही. तम्ही हनुमान आहात मी जांबुवंतच्या भूमिकेत उभा आहे. तुम्ही लंका दहन करणार आहात. दाते यांना विजयी केले तर त्यांना मोठया पदावर बसविण्यासाठी मी केंद्राकडे शिफारस करणार आहे. 

खा.अनिलकुमार जैन 

महामंत्री भाजपा 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post