माय नगर वेब टीम
सातारा - Sharad Pawar on Maharashtra Assembly Election Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा भरघोस यश मिळालं आहे. महायुतीला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालं असताना महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. महायुतीला 234 जागा मिळाल्या असून, भाजपाला 132, शिवसेना 57 आणि राष्ट्रवादी 41 जागा जिंकली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला फक्त 50 जागा मिळाल्या असून, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त 20 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादीला 10 जागा जिंकता आल्या. दरम्यान शरद पवारांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेत त्यांनी या निकालावर भाष्य केलं आहे.
"आमची जी अपेक्षा होती तसा निकाल नाही. पण शेवटी लोकांनी दिलेला निर्णय आहे. त्याचा अभ्यास करणं, कारणीमांसा करणं याची गरज आहे. नव्या उत्साहाने लोकांमध्ये जाऊन उभं राहावं लागेल," असं शरद पवार म्हणाले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागत आहे. बुधवारी (दि. २० नोव्हेंबर) राज्यात २८८ जागांसाठी सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतांचा टक्का वाढला. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी १४५ आमदारांचा पाठिंबा असणे गरजेचे आहे. मात्र महायुतीने बहुमताचा आकडा गाठला आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. भाजपाने १३२, शिवेसना (शिंदे) ५७, राष्ट्रवादी (४१) जागा जिंकल्या आहेत. तर मविआमधील काँग्रेसने १६, राष्ट्रवादी (शरद पवार) १०, शिवसेना (ठाकरे) २० ठिकाणी विजय मिळविला. महायुती २३५, मविआ ४९ आणि इतरांनी ४ जागा जिंकल्या आहेत.
महायुतीने २८८ पैकी २३५ जागा जिंकून महाविकास आघाडीचा दणदणीत पराभव केला.
पुढचा हप्ता कधी मिळणार, याकडे लाभार्थ्यांचे लक्ष असणार - शरद पवार
आता पुढचा हप्ता कधी मिळणार, विज बील कधी माफ होणार, युवकांना पैसे कधी मिळणार, याकडे महिला आणि जनतेचे लक्ष लागणार आहे. त्यामुळे सरकार काय करते? याकडे जनतेचे लक्ष असणार आहे.
ईव्हीएमवर संशय घेणार नाही - शरद पवार
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेकांनी ईव्हीएमवर संशय घेतला आहे. या मशीन बाहेरच्या राज्यातील असल्याचा आरोप केला गेला. या विषयावर बोलताना शरद पवार म्हणाले की, मला या विषयाबाबत फारशी माहिती नाही. त्यामुळे मी या विषयावर बोलणार नाही.
अजित पवार यांच्या जास्त जागा आल्यात, ही गोष्ट मान्य - शरद पवार
विधानसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादी कुणाची, हा प्रश्न विचारला जात आहे. हा प्रश्न शरद पवारांना विचारला असताना ते म्हणाले, अजित पवार यांच्या जास्त जागा निवडून आल्या आहेत. हे मान्य करावे लागेल. पण राष्ट्रवादी काँग्रेसचा संस्थापक कोण आहे? हे सर्वांना माहीत आहे.
लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर येऊन भूमिका मांडली. यावेळी लाडकी बहीण योजनेवर त्यांनी भाष्य केले. या योजनेमुळे महिलांचे मतदान दोन ते तीन टक्क्याने वाढले, असे शरद पवार म्हणाले.
महायुतीच्या आमदारांची मुंबईकडे धाव; गटनेता निवडीपासून मुख्यमंत्री, मंत्रीपदावर होणार चर्चा
महायुतीच्या २३५ आमदारांचा विजय झाला. महायुतीचे सरकार स्थापन होणार असल्यामुळे आता आमदारांनी मुंबईची वाट धरली आहे. आपापल्या पक्षाचा गटनेता निवडणे आणि आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री होण्यासाठी आमदार प्रयत्नशील आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने अजित पवार यांना गटनेतेपदी निवडले आहे.
Post a Comment