*केडगाव व माळीवाडा येथील मतदान केंद्रांवरील प्रकार, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मतदान केंद्रावर सुरक्षेच्या उद्देशाने बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. केडगाव च्या शिवाजीनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील मतदान केंद्र क्र.२६७, २६९, २७० तसेच माळीवाडा परिसरातील हिराबाई सुर्यवंशी प्राथमिक शाळा येथील मतदान केंद्र क्र.२२१, २२२ या ठिकाणी हा प्रकार घडला आहे.
या बाबतची माहिती अशी की नुकत्याच झालेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी नगर शहर मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक प्रशासनाने वेबकास्टिंग केले होते. सदर वेबकास्टिंग करण्याचे काम मॅनेजिंग डायरेक्टर, आयनेट सिक्युअर लॅब प्रा. लि. चेन्नई या कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीमार्फत नगर शहारामधील सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करीता आतील बाजु व बाहेरील बाजु मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम महेश सुभाष गवळी (वय ३२, रा.पागीरे पेट्रोल पंपाजवळ, घोडेगाव, ता. नेवासा) यांना देण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी दि. १६ नोव्हेंबर रोजी रात्री साडे आठ वाजल्या पासुन नगर शहर अंतर्गत मतदान केंद्रावरील प्रत्येक बुथवर वेबकॅमेरे बसवण्याचे काम सुरु केले होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिवाजीनगर, केडगाव येथील बुथ क्रमांक २६७ मधील आतील बाजुचा कॅमेरा नंबर एच एफ 4 जी 053884 तसेच बुथ क्र- २६९ येथील बाहेरील बाजुचा कॅमेरा क्र एच एफ 4 जी 071277 त्यानंतर बुथ क्र २७० बाहेरील बाजुचा कॅमेरा क्र- एच एफ 4 जी 065750 तसेच हिराबाई सुर्यवंशी प्राथमिक शाळा माळीवाडा, रुम नं ३ बुध नं. २२२ बाहेरील बाजुचा कॅमेरा नं एच एफ 4 जी 050737, रुम नं-२ बुथ नं. २२१ बाहेरील बाजुचा कॅमेरा नं- एच एफ 4 जी 066639, असे वेगवेगळ्या नंबरचे कॅमेरे बसवण्यात आले होते.
२० नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर दि. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे आठ वाजण्याचे सुमारास केडगाव येथील बुथवर लावलेले कॅमेरे काढण्याकरीता गवळी यांचे कर्मचारी गेले असता केडगाव येथील १५ हजार रुपये किमतीचे ३ कॅमेरे दिसुन आले नाही. त्याबाबत आजुबाजुस चौकशी केली असता काहीएक माहिती मिळाली नाही. त्यानंतर सकाळी ९ च्या सुमारास माळीवाडा येथील बुथवर लावलेले कॅमेरे काढण्याकरीता गेले असता तेथील १० हजार रुपये किमतीचे २ कॅमेरे दिसुन आले नाही. त्याबाबत आजुबाजुस चौकशी केली असता काहीएक माहिती न मिळाल्याने खात्री झाली की केडगाव व माळीवाडा येथील कोणीतरी अज्ञात चोरटयांनी पाच बूथ वरील एकूण २५ हजार रुपये किंमतीचे कॅमेरे चोरुन नेले आहेत.
या प्रकरणी महेश गवळी यांनी मंगळवारी (दि.१०) सायंकाळी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
Post a Comment