माय नगर वेब टीम
Champions Trophy Tentative Schedule: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ हायब्रीड मॉडेलवर खेळवली जाणार असल्याचे काही दिवसांपूर्वी आयसीसीने घोषित केले. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआय यांच्यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मुद्द्यांवर सहमती झाल्यानंतर हायब्रीड मॉडेलचा प्रस्ताव मंजूर झाला. दरम्यान आयसीसीच्या या निर्णयानंतर काही दिवसातच चॅम्पियन्स ट्रॉफीचे तात्पुरत्या स्वरुपाचे वेळापत्रक समोर आले आहे.
रेव स्पोर्ट्जने दिलेल्या माहितीनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात १९ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. पहिला सामना हा यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये कराची येथे होणार आहे. त्यानंतर लगेचच २० फ्रेबुवारीला भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपला पहिला सामना बांग्लादेश विरोधात खेळणार आहे. तर भारत आणि पाकिस्तान हे २३ फेब्रुवारी २०२५ रोजी आमनेसामने येणार आहेत. ४ आणि ५ मार्च या दोन दिवसांमध्ये उपांत्य फेरीतील सामने होतील. तर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना ९ मार्च २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन गट पाडण्यात आले आहेत. यातील एका गटामध्ये भारत आणि पाकिस्तानचा समावेश आहे. या दोन देशांसह न्यूझीलंड आणि बांग्लादेश हे एका गटाचा भाग असणार आहेत. तर दुसऱ्या गटात अफगाणिस्तान, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या चार संघांचा समावेश असणार आहे. पाकिस्तानमधील लाहोर, रावलपिंडी आणि कराची या तीन शहरांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने भरवले जाणार आहेत. अंतिम सामन्यासह इतर सामने कोणत्या स्टेडियममध्ये होणार आहेत, याबाबतची माहिती सध्यातरी गुलदस्त्यातच आहे.
भारताचे चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सामने:
२० फ्रेबुवारी २०२५ - भारत वि. बांग्लादेश
२३ फ्रेबुवारी २०२५ - भारत वि. पाकिस्तान
२ मार्च २०२५ - भारत वि. न्यूझीलंड
भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता. पुढे आयसीसीच्या मध्यस्तीनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हायब्रीड मॉडेल वापरले जाईल असा निर्णय घेण्यात आला. यानुसार भारतीय संघ दुबईमध्ये सामने खेळणार आहे. तर पाकिस्तानचा संघाचे सामने त्यांच्या देशातच होणार आहेत असे म्हटले जात आहे. या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर २०२७ पर्यंतच्या आयसीसीच्या सर्व महत्त्वपूर्ण स्पर्धा हायब्रीड मॉडेलनुसार आयोजित केल्या जाणार आहेत.
Post a Comment