IND vs AUS 2nd Test : सिराज-हेडला भर मैदानात वाद घालणं पडलं महागात, ICC ने केली मोठी कारवाई….



माय नगर वेब टीम

IND vs AUS 2nd Test (Siraj vs Head) :- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना ॲडलेड ओव्हल येथे खेळला गेला. गुलाबी चेंडूच्या या कसोटीत कांगारू संघाने 10 गडी राखून विजय मिळवला. दरम्यान, ॲडलेड कसोटीदरम्यान टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रॅव्हिस हेड यांच्यात वाद झाला होता. हेडला बाद केल्यानंतर सिराजने आक्रमक शैली दाखवली. त्यावर हेडने सुध्दा त्याला प्रत्युत्तर दिले होते. अशाप्रकरारे भर मैदानात वाद घालणं सिराज आणि हेडला महागात पडलं आहे. कारण आता याप्रकरणी आयसीसीने गंभीर दखल घेत मोठे पाऊल उचलले आहे.


या सामन्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला मोठा धक्का बसला आहे. आयसीसीने त्याच्यावर मॅच फीच्या 20 टक्के रक्कमेचा दंड ठोठावला आहे. सिराजला ही शिक्षा ट्रॅव्हिस हेडसोबत सामन्यात वाद घालण्याबद्दलमिळाली आहे. तर आयसीसीने ट्रॅव्हिस हेडवर कोणताही दंड ठोठावला नाही. मात्र, आयसीसीने सिराज आणि हेड दोघांना 1-1 डिमेरिट पॉइंट दिला आहे.


आयसीसीने सांगितले की, “सिराज आणि हेडला शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये 1-1 डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे, जो गेल्या 24 महिन्यांतील त्यांचा पहिला गुन्हा आहे.”  गेल्या 24 महिन्यांतील सिराज आणि हेडची ही पहिलीच चूक होती, त्यामुळे कोणावरही सामन्यासाठी बंदी घालण्यात आली नाही. दोघेही 14 डिसेंबरपासून ब्रिस्बेन कसोटीत खेळू शकतात.


आयसीसीने सिराजला आचारसंहितेच्या कलम 2.5 चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. त्यानुसार खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफविरुद्ध अपशब्द वापरल्यास कारवाई केली जाते. तर हेड याला आचारसंहितेच्या कलम 2.13 चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे. त्यानुसार खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफविरूध्द गैरवर्तन केल्यास कारवाई केली जाते.


सिराज आणि हेड यांनी आपली चूक मान्य करत सामनाधिकारी रंजन मदुगले यांच्यासमोर आरोप स्वीकारले आहेत. त्यामुळेच सुनावणीची गरज भासली नाही. अशा परिस्थितीत आयसीसीने दोघांनाही दोषी ठरवून शिक्षा सुनावली.


दरम्यान, ॲडलेड कसोटीत भारताच्या पराभवापेक्षा मोहम्मद सिराज आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यातील भांडण जास्त चर्चेचा विषय झाले आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी हेडला बाद केल्यानंतर सिराजने आक्रमकपणे सेलिब्रेशन केले होते, त्यामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाज हेड आनंदी दिसला नाही आणि त्याने काही शब्द सुनावले. यावर सिराजने त्याला तंबूत जाण्याचा इशारा केला. यावर दोघांनीही आपापली बाजू मांडली.


काय आहे वाद ?

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रेव्हिस हेड 141 चेंडूत 140 धावांची खेळी केली होती. यावेळी सिराज गोलंदाजी करत होता. सिराजने त्याला भन्नाट यॉर्कर टाकून त्रिफळाचित केले. हेड बाद झाल्यानंतर सिराजने नेहमीच्या शैलीत आनंद व्यक्त करताना, बाद झालेल्या हेडची व सिराज यांची शाब्दिक हाणामारी झाली. त्यानंतर काही वेळासाठी वातावरण तापले होते. याचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


हेड खोटे बोलत असल्याचा सिराजनं केला होता दावा…

त्याचवेळी हेड खोटे बोलत असल्याचा दावा सिराजने केला. तो म्हणाला, ‘मी हेडला गोलंदाजी करण्याचा आनंद घेत होतो. ही एक चांगली लढत होती कारण त्याने खरोखरच चांगली फलंदाजी केली. जेव्हा एखादा फलंदाज तुम्हाला चांगल्या चेंडूवर षटकार मारतो तेव्हा वाईट वाटते. यामुळे मला ऊर्जा मिळाली. त्याला आऊट केल्यानंतर मी सेलिब्रेशन केले.


त्यानंतर त्याने मला शिवीगाळ केली. तुम्ही ते टीव्हीवरही पाहू शकता. सुरुवातीला मी फक्त उत्सव साजरा करत होतो. मी त्याला काहीच बोललो नाही. पत्रकार परिषदेत त्यांनी खोटे सांगितले. त्यांनी चुकीचे विधान केले. आम्ही सर्वांचा आदर करतो. मी नेहमीच सर्वांचा आदर करतो कारण क्रिकेट हा सज्जनांचा खेळ आहे. ट्रॅव्हिस हेडची कृती चुकीची होती. मला बरे वाटत नव्हते, असे सिराज म्हणाला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post