माय नगर वेब टीम
अहिल्यानगर - केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयामार्फत देशभरात पीएम ई-बस सेवा योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. केंद्र शासनाने जाहिर ई निविदे द्वारे, बसेस पुरविणेसाठी JBM Ecolife Mobility Private Ltd, New Delhi या कंपनीची निवड केलेली आहे.या योजनेत देशातील १६९ शहरांचा समावेश करण्यात आला असून अहिल्यानगर शहरासाठी ४० ई-बसेस उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी महापालिका केडगाव येथे चार्जिंग स्टेशन उभारत आहे. महावितरणकडून चार्जिंग स्टेशनच्या प्रस्तावित जागेपर्यंत वीज पुरवठा उपलब्ध करण्याचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात दहा बसेस उपलब्ध होणार असून, लवकरच या बसेस उपलब्ध होणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.
पीएम ई-बस सेवा योजनेसाठी केंद्र सरकारने १६ ऑगस्ट २०२३ रोजी २० हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यातून १६९ शहरांना तब्बल १० हजार ई-बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. २० ते ४० लाख लोकसंख्येच्या शहरात प्रत्येकी १५०, १० ते २० लाख व ५ ते १० लाख लोकसंख्येच्या शहरात प्रत्येकी १०० व ५ लाखांच्या आतील लोकसंख्येच्या शहरात प्रत्येकी ५० पर्यंत ई-बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. नगर शहराला गरजेनुसार ३५ सीटच्या ४० बसेस उपलब्ध होणार आहेत. केंद्र शासनाने बस उपलब्ध करून देण्यासाठी नवीदिल्ली येथील कंपनीला काम दिले आहे.
चार्जिंग स्टेशनसाठी महापालिकेने केडगाव येथील अडीच एकर जागा निश्चित केली आहे. तेथे वीज भार मंजूर झालेला आहे. सोनेवाडी सब स्टेशन पासून महापालिकेच्या सबस्टेशन पर्यंत विजेचा पुरवठा करणारी उच्चदाब वाहिनी टाकण्याचे काम महावितरणमार्फत सुरू आहे. या कामाचा खर्च केंद्र सरकार करणार असून हा १.९७ कोटी रुपयांचा निधी थेट महावितरणकडे वर्ग झाला आहे. तसेच, चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी ९.०६ कोटी रुपये मंजूर असून त्याचे कामही सुरू झाले आहे. कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या असून, लवकरच हे कामही पूर्ण होईल, असे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.
Post a Comment