लंके परिवार पराभवाने खचणारा नाही!; राणी लंके नेमकं काय म्हणाल्या पहा...



पारनेर येथे विविध उपक्रमांनी शरद पवारांचा वाढदिवस साजरा 

माय नगर वेब टीम 

पारनेर : विधानसभा निवडणूकीतील पराभवानंतर मी शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर काम करण्यासाठी मला नवी उर्जा मिळाली. विधानसभा निवडणूकीत पराभव झाला असला तरी लंके परिवार हा खचून जाणारा नाही. आमचा जन्म समाजासाठी झालेला आहे. निकालच्या दुसऱ्या दिवसापासून आम्ही कामाला सुरूवात केली. पराभव झाला म्हणून कोणीही खचून जाऊ नका. पराभव मनातून काढून टाका, नव्या उभारीने कामाला सुरूवात करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मा. सदस्या राणी लंके यांनी केले. 

    शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खा. नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून ५०० गरजू विद्यार्थ्यांना सायकल वितरण, वृध्दांना काठी वाटप करण्यात आले. तसेच नेत्रतपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मा वाटप मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. दि. ५ जानेवारीपर्यंत हे शिबिर मतदारसंघाच्या विविध गावांमध्ये घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमानिमित्त बोलताना राणी लंके यांनी कार्यकर्त्यांना खचून न जाण्याचा सल्ला दिला. 

        यावेळी बोलताना राणी लंके म्हणाल्या, शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खा. नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून दरवर्षी समाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.  दरवर्षी आगळे वेगळे उपक्रम राबविण्यात येत असल्याने शरद पवार यांचा वाढदिवस नेहमीच स्मरणात रहात असल्याचे राणी लंके यांनी सांगितले.  यावेळी बाबाजी तरटे ,संभाजी रोहोकले, बापू शिर्के, राजेंद्र चौधरी, सुवर्णा धाडगे, पूनम मुंगसे,  अशोक रोहोकले, गंगाराम बेलकर, जयसिंग मापारी, अर्जुन भालेकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. रवींद्र राजदेव यांनी सूत्रसंचलन केले. 

दातृत्ववान नेतृत्व 

गेल्या पंधरा वर्षांपासून खा. नीलेश लंके हे सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी संघर्ष करत आहेत. एक दातृत्ववान नेतृत्व आपल्याला नेतृत्व लाभले आहे. पोटाला चिमटा घेऊन दुसऱ्याला काहीतरी देण्याची त्यांची धडपड असते. त्याच हेतूने त्यांनी सायकल वितरण, मोफत चष्मा वाटप व मोतीबिंदू  शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

बापूसाहेब शिर्के शिर्के (उपसभापती, बाजार समिती )

निःस्वार्थ भावनेने  उपक्रम 

२४ तास ३६५ दिवस काम करणारा लंके परिवार आहे. यापूवही खा. लंके यांच्याकडून विद्यार्थी, गरजूंना मदत करण्यात आलेली आहे. हे उपक्रम राबविताना कोणताही स्वार्थ न ठेवता निस्वार्थ भावनेने उपक्रम राबवितात. सर्वसामान्य घरात जन्म घेऊनही दातृत्व काय असते हे लंके परिवाराने कृतीतून दाखवून दिले आहे. असे असतानाही हे ओळखण्यात आपण कुठेतरी कमी पडलो याची खंत होते. भविष्यात काहीतरी चांगले घडावे यासाठी असे घडले असेल आणि त्यातून आपणास आनंद मिळेल. चमकणारा हिरा म्हणजे खा. नीलेश लंके हे आहेत. 

सुवर्णा धाडगे (राष्ट्रवादी महिला आघाडी तालुकाध्यक्ष)

ईव्हीएमने घडवून आणलेला पराभव  

मागील महिन्यात आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागले. हा आपला पराभव नसून ईव्हीएमने घडवून आणलेला पराभव आहे. गुजरातमधून ईव्हिएम आणण्यात येऊन मोठं मोठया नेत्यांचे खच्चीकरण करण्यात आले. येणारा भविष्यकाळ आपल्यासाठी  चांगला असेल. लंके परिवार खचणारा नसून संघर्ष करणार आहे. 

अर्जुन भालेकर

जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस 

 कुठे कमी पडलो हे तपासा 

निवडणूकीतील पराभवाचा या कार्यक्रमात उल्लेख झाला. यश प्रत्येक वेळी मिळतेच असे नाही. पराभवाने खचून न जाता भगवतगितेमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण आपले काम करत आहोत. पराभवाची कारणे शोधली पाहिजेत. आत्मपरिक्षण केले पाहिजे. एका पराभवाने आपण खचून जाणारे नाहीत.  ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनी किती प्रामाणिकपणे काम केले याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. मीच खासदार या भावनेतून आपण वागल्याने हा पराभव ओढावला आहे. विरोधकांना नावे ठेवण्यापेक्षा आपण कुठे कमी पडलो हे तपासणे गरजेचे आहे. 

राजेंद्र चौधरी 

मा. पंचायत समिती सदस्य 

समाजोपयोगी काम थांबणार नाही 

विद्यार्थ्यांना सायकल वाटपाचा कार्यक्रम पहिल्यांदाच ठेवलेला नाही. गेल्या पाच सहा वर्षांमध्ये शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक समाजउपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत. यंदा सायकल वितरणाबरोबरच डोळयांच्या सर्व विकारांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. चष्मे वाटप करण्यात येणार आहे. निवडणूका डोळयापुढे ठेऊन समाजोपयोगी उपक्रम राबविणे असा खा. नीलेश लंके यांचा पिंड नाही.  सत्ता असो वा नसो समाजोपयोगी कामे थांबणार नाही असे राजेंद्र चौधरी यांनी सांगितले. 

५६३ रूग्णांची नेत्र तपासणी 

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या ५ जानेवारीपर्यंत पारनेर-नगर मतदारसंघात मोफत नेत्रतपासणी, मोतिबिंदू शस्त्रकिया व चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्याचा शुभारंभ गुरूवारी बाभुळवाडे व वडझिरे येथे करण्यात आला. बाभुळवाडे येथे १५३ रूग्णांची तपासणी करण्यात येऊन ११८ रूग्णांना चष्मे वितरण करण्यात आले तर ५ रूग्णांचे मोतीबिंदूंचे निदान झाले असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. तर वडझिरे येथे ४५० रूग्णांची नेत्रतपासणी, २८० रूग्णांना चष्मा वितरण करण्यात आले. २२ रूग्णांचे मोतीबिंदूचे निदान झाले असून त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post