शेत जमिनीच्या बांधावरून दोन समाजाच्या गटात राडा

 


माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर  - शेत जमिनीच्या बांधावरून दोन समाजाच्या गटात हाणामार्‍या झाल्या. महिलांसोबत गैरवर्तन करण्यात आल्याची घटना नगर तालुक्यातील एका गावात रविवारी (22 डिसेंबर) घडली. या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात 15 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

42 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित आरोपी शेतीच्या बांधावर पोल रवत असताना त्यांना मनाई केली असता त्यांनी माझ्यासह नातेवाईकांना शिवीगाळ, दमदाटी करून दगडाने मारहाण केली. एकाने माझ्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. शेतात पाय ठेवला तर जीवे मारून टाकू अशी धमकी दिली. माझ्या मुलाने जाब विचारला असता त्यालाही मारहाण केली. झटापटीत सोन्याचे दागिने गहाळ झाले आहे.

दुसर्‍या गटाच्या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून नऊ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आम्ही शेत जमिनीच्या बांधालगत पोल रवत असताना संशयित आरोपी तेथे आले. त्यांनी पोल का रवता असे म्हणून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व लोखंडी रॉड, दगड, दांडके, चैनने मारहाण केली. दोघांनी माझ्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. झटापटीत सोन्याचे दागिने तुटून नुकसान झाले व तीन मोबाईल गहाळ झाले आहे.

दरम्यान, मारहाणीची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही गटाच्या फिर्यादी नोंदवून घेत तपास सुरू केला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post