Beed Sarpanch Murder Case : गावच्या भल्याचा विचार करणे जीवावर बेतले; सरपंचाच्या हत्येचे कारण आले समोर

 


माय नगर वेब टीम

बीड : बीडमधील केज तालुक्यातीस मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा काही दिवसांपूर्वी अपहरण करून खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. मात्र आता सरपंच संतोष देशमुख यांचा कोणत्या कारणामुळे खून करण्यात आला हे आता समोर आले आहे. गावाच्या भल्याचा विचार करणे सरपंच संतोष देशमुख यांच्या जीवावर बेतले आहे.

‘या’ कारणामुळे करण्यात आला खून

मस्साजोग गाव शांत आणि भांडण तंट्यापासून खूप लांब..याच गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्येमुळे गावाला धक्का बसला आहे. गाव शिवारातील पवन चक्की कार्यालयातील गावच्या वॉचमनला मारहाण झाली म्हणून सरपंच सोडवायला गेले आणि त्यानंतर त्यांचे अपहरण झाले आणि त्यांची हत्या करण्यात आली. सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्येचे कारण तिथे आलेला विंड मिलचा प्रकल्प आहे.

या प्रकल्पासाठी संतोष यांनी जागा मिळवून दिली. एवढचं आपल्या गावातील काही तरुणांना तिथे कामाला लावले. अवाणा विंड मिल कंपनीला मदत करण्याची जबाबदारी सरपंच संतोष देशमुख यांची होती. मस्साजोगपासून जवळ असलेल्या टाकळी गावातील काही तरुण विंड मिलच्या ऑफिसला आले. त्यांनी मस्साजोग गावाच्या अशोक सोनवणे नावाच्या वॉचमनला मारहाण केली.

टाकळी गावच्या तरुणांनी वॉचमनला मारहाण झाल्याने सरपंच संतोष काही तरुणांसोबत तिथे गेले. टाकळी गावच्या तरुणांना तिथून हुसकावून लावले. काही उत्साही तरुणांनी टाकळी गावच्या तरुणांना मारहाण केली.त्याचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला. मारहाणीचा हा व्हिडीओ हत्या करणाऱ्यांच्या जिव्हारी लागला. विंड मिलवर आलेला ग्रुप खंडणी मागायला आला होता असे मस्साजोगच्या ऑफिस बॉयने सांगितले.

यानंतर या मारहाणीचा बदला घेण्याचे उद्देशाने आरोपींनी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण केले आणि त्यांची हत्या केली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आपल्या गावचे भले करणे सरपंच संतोष देशमुख यांच्या जीवावर बेतले आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी आणि ग्रामस्थांनी आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी सरकारकडे केली आहे.

म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं सोमवारी (९ डिसेंबर) अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. संतोष देशमुख यांचं आधी अपहरण करण्यात आलं. त्यानंतर त्यांचे कुटुंबीय, निकटवर्तीय व मित्र परिवाराने त्यांचा शोध घेतला. मात्र, ते कुठेच आढळून आले नाहीत. त्यानंतर त्यांचा मृतदेह सापडला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर आरोपींवर देखील कारवाई करण्याचं काम चालू असून त्यांना देखील लवकरच अटक केली जाईल असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं आहे. तसेच गावकऱ्यांनी एका पीएसआयवर काही आरोप केले होते. त्यानंतर त्या पीएसआयचं लगेच निलंबन करण्यात आलं.

दरम्यान, “माझ्या पोटचा गोळा गेला आहे, आम्हाला सरकारने न्याय द्यावा”, अशा शब्दांत मयत संतोष देशमुख यांच्या आईने टाहो फोडला. तसेच “माझ्या पतीच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी”, अशी मागणी देशमुख यांच्या पत्नी अश्विनी यांनी केली आहे. टीव्ही ९ मराठीने मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. यावेळी देशमुख कुटुंबाने सरकारकडे न्यायाची मागणी केली आहे.

संतोष देशमुख यांच्या पत्नीचा टाहो

अश्विनी देशमुख म्हणाल्या, “माझे पती लातूरला होते. ते काही कामानिमित्त लातूरला थांबणार होते, मात्र नंतर त्यांनी गावी जायचं ठरवलं. त्यांना नेहमीप्रमाणे काही फोन आले होते. काही कामानिमित्त गावाकडे जावं लागणार होतं आणि ते गावाकडे निघाले. दुपारी १२ वाजता ते निघाले. मी दुपारी १.३० च्या सुमारास त्यांना फोन केला, त्यांना विचारलं की तुम्ही गावी पोहोचलात का? त्यावर ते म्हणाले, नाही, मी आत्ता चंदनसावरगावला पोहोचलो आहे. गावी पोहोचायला थोडा वेळ लागेल. त्यानंतर माझं त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचं बोलणं झालं नाही. माझे पती गेल्या १५ वर्षांपासून या गावचे सरपंच आहेत. १५ वर्षांपासून गावकऱ्यांसाठी काम करत आहेत. आमच्यासाठी, गावकऱ्यांसाठी ते देवासारखे होते. जनतेसाठी दिवस रात्र धावपळ करत असायचे. बऱ्याचदा जनतेची काम करताना ते घरच्यांना विसरून जायचे. कधी माझी मुलं आजारी पडली तर त्यांना रुग्णालयात त्यांनी नेलं नाही. मला म्हणायचे, तू त्यांना घेऊन जा. माझ्यावर दवाखान्यात जायची वेळ आली तर म्हणायचे, घरातल्या कोणाबरोबर तरी जा. कारण ते जनतेच्या कामात गुंतलेले असायचे. जनतेसाठी सदैव तत्पर असायचे. त्या देव माणसाची हत्या केली आहे. त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे किंवा माझ्या पत्नीबरोबर जे झालं तेच त्या मारेकऱ्यांबरोबर व्हायला हवं”.

संतोष देशमुख यांच्या आई म्हणाल्या, “माझ्या लेकराने सदैव लोकांची मदत केली. गोरगरिबांची मदत केली, म्हणून माझ्यावर ही वेळ आली आहे का? अशी वेळ कोणावरही येऊ नये. अशा लोकांना संरक्षण मिळायला पाहिजे. माझ्या लेकाची हत्या का झाली? कोणी केली? हे मला समजलं पाहिजे”.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post